निर्णय

Post Reply
User avatar
rajsharma
Super member
Posts: 15829
Joined: 10 Oct 2014 07:07

निर्णय

Post by rajsharma »

निर्णय


असंच एक जुनं पुस्तक चाळताना अमृताला एक वाक्य पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटत होतं. कितीही प्रयत्न केला तरी त्या विचारात आज ती अडकून पडली होती.

‘सर्व सुंदर चेहरे मनाने चांगले असतातच असे नाही’ या विचाराची भुरळ तिला पडावी या पाठीमागे खूप मोठा आठवणींचा ओलावा होता. आज ती त्या मागच्या आठवणी इच्छा नसताना एकांतात मनाच्या कोप-यात आठवत होती. एक एक क्षण तिला काहीसा उद्विग्न करत होता.

अमृता दिसायला जशी सुंदर होती, तशी अभ्यासात हुशार होती. सदूबाची एकुलती एक मुलगी असल्याने खूपच लाडात वाढलेली. संपूर्ण आंबेवाडीत तिच्यासारखी नेतृत्व करणारी मुलगी नव्हती. गावात कोणताही सण असुद्या, त्यात हि सर्वांना सामावून घेत होती.

ग्रामस्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, आरोग्य शिबीर, आदिवासी संस्कृती संवर्धन, व्यवसाय मार्गदर्शन असे विविध कार्यक्रम ती आपल्या कॉलेजच्या मित्र मैत्रिणींच्या मदतीने आयोजित करत होती. सामाजिक कार्याची खूपच आवड असल्याने तिची सर्वजण वाहवा करत होते.

मुलीच्या शिक्षणासाठी सदूबाने तिला तालुक्याला शासकीय वसतिगृहात ठेवलेले होते. गावाकडे महाविद्यालयीन शिक्षणाची सोय नसल्याने त्यांना अमृताला घरापासून दूर ठेवावे लागले होते.

अमृता आपला अभ्यास वेळेत पूर्ण करत होती. बीएडच्या अभ्यासक्रमात खरे तर सर्व काही वेळेत पूर्ण करावं लागतं. सर्व प्राध्यापकांना तिचा अभिमान वाटत होता. निकाल लागला व त्यात अमृताला डिस्टिंक्शनमध्ये गुण मिळाले. निकालानंतर लगेच तिला कनिष्ठ महाविद्यालयात नोकरी मिळाली होती. आपल्या मुलीच्या यशाने सदूबा खूप आनंदी होता.

रविवार व सोमवार अशी जोडून सुट्टी आल्याने एक दिवस अमृता गावी आली. गावातील सर्वच लोक तिला भेटायला आले होते. सर्वांना तिच्या यशाचा हेवा वाटत होता. ‘पोरीनं बापाचं नाव राखलं’ अशा प्रतिक्रिया तिला ऐकू येत होत्या. सदूबा आणि कमला हे दोघे तर मुलगी आल्याने खूपच हुरळून गेले होते.

संध्याकाळी गोड जेवण बनविण्यात आले. आज खूप दिवसांनी तिघे एकत्र जेवण करत होते. त्यांच्या मनसोक्त गप्पा जेवण झाल्यावरही खूप उशिरापर्यंत सुरु होत्या. कमलाने आता खूप उशीर झालाय आता झोपायला पाहिजे अशी आठवण करून दिली.

झोपण्याची आठवण होताच अमृताने सदूबाला म्हटले, “बाबा, तो पवारांचा विक्रम आहे ना… तो मला खूप आवडतो. मला त्याच्याशी लग्न करायचे आहे ” क्षणार्धात सारं आकाश कोसळावं आणि त्यात दडपून जीव गुदमरून जावा अशी अवस्था सदूबाची झाली होती.

आदिवासी कुटुंबात मुलीला प्रमुख स्थान दिले जाते. लग्नात मुलीच्या पसंतीला महत्व दिले जाते. असे असतानाही सदूबा होकार देत नव्हता व नकार देण्याची त्याची हिम्मत होत नव्हती. कारण त्याचे आपल्या मुलीवर जीवापाड प्रेम होते आणि नकार देऊन तिला परकं करायचं नव्हतं. सदूबाचा अमृताच्या प्रेमविवाहाला खरे तर विरोध नव्हता.

विक्रम पवार हा दिसायला सुंदर होता. त्यामुळे त्याने अलगद अमृताला आपल्या जाळ्यात ओढले होते याची जाणीव सदूबाला होती. विक्रम हा परजातीचा होता. त्यात तो दहावी नापास आणि कोणत्याही प्रकारच्या कामाची कुवत त्याच्याकडे नव्हती. गावात उनाडक्या करत फिरणे हेच काम तो करत होता.

त्यामुळे सदूबा अमृताला सांगत होता, “अगं, तुला लग्नच करायचं आहेस तर दुसरा पण लायक मुलगा बघ तुझ्यासारखा शिकलेला.” अमृता काही ऐकायला तयार नव्हती. “करिन तर त्याच्याशीच लग्न करील,” असा हट्ट ती व्यक्त करत होती.

“त्याचं तुझ्यावर प्रेम नाही तर तुझ्या पगारावर आहे,” असे सदुबा तिला खूप समजावत होते. “त्याच्या सुंदर चेह-यावर जाऊ नकोस. त्याचं काम बघ,” असे म्हणून सदूबा झोपायला निघून गेला.

पंधरा वीस मिनिटांच्या त्यांच्या संवादातून सदूबा पुरता हतबल झाला होता. त्याला झोप येत नव्हती. तो आपल्या घराच्या छताकडे पाहून सारखी कूस बदलत होता.

सकाळ झाली अमृता गावात जुन्या मैत्रिणींकडे भेटायला गेली होती. सदूबा नेहमी लवकर उठून शेतावर फिरून येत असे. आज मात्र तो काहीसा उदास दिसत होता. दुपार झाली अमृता परत जायला निघाली.

नेहमी काळजी घे म्हणून निरोप देणारा सदूबा आज काही बस स्थानकावर आला नव्हता. अमृताच्या आईला काही समजत नव्हते कि नेमके काय बिनसले आहे. परंतु ती काही बोलत नव्हती.

तो घरात बसलेला असला तरी त्याला आपल्या मुलीचा विरह सहन होत नव्हता. त्याचे तहानलेले प्रेम आता कसे भरून निघणार या विचारात तो मनातल्या मनात तडफडत होता.

अमृताला आपल्या वडिलांची मानसिकता माहीत होती. परंतु विक्रमच्या प्रेमात तिला काही उमजत नव्हते. विक्रमने तिला लग्नाबद्दल वडील काय म्हणाले ते विचारले.

“देतील रे होकार. आपण वाट पाहू. पुन्हा त्यांना विनंती करू,” असे अमृता त्याला समजावत होती.

दोन चार दिवस गेले कि तो पुन्हा लग्नाचा विषय तिच्यासमोर मांडत असे. आता अमृताने आपली जिवलग मैत्रीण किर्तीला हा संपूर्ण विषय समजावून सांगितला. अमृताने वडील का नकार देत आहेत हे मात्र तिला काही सांगितले नाही.

एक दिवस अमृता व कीर्ती या दोघी आंबेवाडीला आल्या. कीर्तीची हि पहिलीच वेळ गावाला येण्याची असली, तरी सदूबा बरोबर ती अनेकदा फोनवर बोलली होती. म्हणजे अगोदर त्यांची ओळख होती. कीर्तीने घरात येताच सदूबाला नमस्कार केला.

“आज कसा काय रस्ता चुकला. इकडं गावाला आलीस?” सदुबाने हसत विचारले.

अमृताच्या आईने दोघीना पाणी दिले व बसायला सांगितले. दुपारची जेवणाची वेळ टळून गेल्याने आई जेवण तयार करण्यासाठी घरात निघून गेल्या. अमृताही आईला मदत करण्यासाठी घरात गेली. आता सदूबा व कीर्ती दोघेच गप्पा मारत होते.

काही वेळ चर्चा झाल्यावर किर्तीने मुद्द्याला हात घातला. “काका, तुमचं अमृता आणि विक्रमच्या लग्नाविषयी काय म्हणणं आहे?” असा स्पस्ट प्रश्न किर्तीने केला.

“आता विचार काय करायचा मुली. विक्रमचं वागणं काही धड नाही. त्याचं शिक्षण तरी किती झालंय. त्याला मुलगी देणं म्हणजे पायावर दगड मारून घेण्यासारखे आहे,” सदुबा पुटपुटला.

“पण त्यांचं प्रेम आहे एकमेकांवर. आज ना उद्या तो पण काम करेलच कि.”

“कसला काम करतोय. त्याला काम करायचे असते तर कधीच केले असते. असा फिरला नसता गावभर कुत्रे मारत.”

“त्याला आपण वेळ दिला पाहिजे. कारण अमृता जीवापाड प्रेम करते त्याच्यावर आणि त्याच्याशिवाय ती जगू शकत नाही.”

“अगं मग काय आम्ही तिचे दुष्मन आहोत. आम्हाला काय तिचे चांगले व्हावे असे वाटत नाही का?”

“तसे नाही. पण तरी अजून आपण विचार करावा असे मला वाटते,” कीर्ती हळू आवाजात बोलली.

“तिने तिच्या प्रेमाविषयी विचारल्यापासून मी विचारच करतोय. नीट जेवण जात नाही कि तहान लागत नाही. झोपलो नाही मी या विचारानं.”

“तुम्ही विनाकारण त्रास करून घेत आहात.”

“आता कसला त्रास? तिला जन्म दिला. जीवापल्याड जपलं. आम्ही उपाशी राहिलो पण तिला काही कमी पडू दिले नाही. अजून काय करायचे राहिले. नेमके आम्ही कुठे कमी पडलो हेच मला समजत नाही.”

“तुमच्या उपकाराची परतफेड होऊच शकत नाही. परंतु आपण तिच्याही भावना समजून घेतल्या पाहिजेत,” कीर्ती सदूबाला सांगत होती.

“आमच्या भावना पायदळी तुडवून तिला जो निर्णय घ्यायचा आहे, तो तिने घेतला आहे. तिला जे करायचे आहे ते ती करायला मोकळी आहे, कारण आता तिला चांगला पगार मिळतोय. तिला कुठे आमची गरज राहिली आहे.”

“काका. तरी मला वाटते तुम्ही विक्रमला संधी द्यायला पाहिजे. मला खात्री आहे, तो नक्की स्वताच्या पायावर उभा राहील.”

“जाऊ दे पोरी, तुम्ही दोघी ठरवूनच आल्या आहात. तुम्ही काय आम्हाला समजून घेणार. पण एक सांगतो, तो मुलगा तिच्या पगारावर प्रेम करतोय आणि ती त्याच्या बाहेरच्या सुंदर्यावर म्हणून म्हणतो जगातले सर्वच सुंदर चेहरे मनाने चांगले नसतात हे तिने समजून घ्यावे आणि नसेलच तिला समजून घ्यायचे तर तिचा मार्ग आम्ही अडविलेला नाही. ती आमच्याशिवाय हवे त्या मुलाबरोबर लग्न करु शकते. फक्त आम्ही या लग्नाला येणार नाही.”

सदूबाच्या डोळयात पाणी आले होते. तहानलेले प्रेम डोळ्यातून व्यक्त होत होते. पण ते समजून घेणारे कोणी नव्हते.

सर्वांनी एकत्र जेवण केले. कोणी कोणाबरोबर बोलत नव्हते. किर्तीला समजत नव्हते कि नक्की कोणाच्या बाजूने आपण उभे राहावे. शेवटी तिने मैत्रिणीला धीर दिला.

दुस-या दिवशी अमृता व कीर्ती आपल्या नोकरीच्या ठिकाणी परत आल्या. विक्रम त्यांना घ्यायला हजर होता. विक्रमच्या प्रश्नाला तिने उत्तर दिले, “आपण कोर्ट मॅरेज करू.”

किर्तीनेही या निर्णयाला सहमती दर्शविली. विक्रमच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध नव्हता. त्यामुळे लवकरच लग्नासाठी नाव नोंदविण्यात आले. प्रत्यक्ष लग्नाच्या दिवशी मुलीकडील कोणीही हजर नव्हते. मुलाकडील मात्र सर्वच हजर होते.


,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
Read my all running stories

(वापसी : गुलशन नंदा) ......(विधवा माँ के अनौखे लाल) ......(हसीनों का मेला वासना का रेला ) ......(ये प्यास है कि बुझती ही नही ) ...... (Thriller एक ही अंजाम ) ......(फरेब ) ......(लव स्टोरी / राजवंश running) ...... (दस जनवरी की रात ) ...... ( गदरायी लड़कियाँ Running)...... (ओह माय फ़किंग गॉड running) ...... (कुमकुम complete)......


साधू सा आलाप कर लेता हूँ ,
मंदिर जाकर जाप भी कर लेता हूँ ..
मानव से देव ना बन जाऊं कहीं,,,,
बस यही सोचकर थोडा सा पाप भी कर लेता हूँ
(¨`·.·´¨) Always
`·.¸(¨`·.·´¨) Keep Loving &
(¨`·.·´¨)¸.·´ Keep Smiling !
`·.¸.·´ -- raj sharma
User avatar
rajsharma
Super member
Posts: 15829
Joined: 10 Oct 2014 07:07

Re: निर्णय

Post by rajsharma »

अमृताने किर्तीला सोबत घेऊन लग्नाचे ठिकाण गाठले होते. प्रेमात वेडी झालेल्या अमृताला आपल्या आई वडिलांचा विसर पडला होता. लग्न पार पडले होते. दोन दिवसांनी रिसेप्शन निश्चित करण्यात आले.

विक्रमने आपले मित्र व नातेवाईक यांना आमंत्रण देऊन टाकले होते. अमृतानेही आपल्या मित्र मैत्रिणींना आग्रहाचे आमंत्रण दिले होते. लग्न झाल्याच्या आनंदात ती आई वडिलांना बोलवायला विसरली होती.

कीर्तीने मात्र अमृताला न विचारता सदूबाला निरोप दिला होता. आपल्या पोटच्या गोळ्याने आपला घात केला या नुसत्या विचाराने तो अर्धमेला झाला होता. आता सारं संपलं या विचाराने त्याने रिसेप्शनला जाण्याचा विचार सोडून दिला. आपल्या मुलीसह!

मुलीने लायक नसलेल्या मुलासोबत लग्न केले या विचारात सदूबा पुरता खचला होता. त्याचे मन कशात लागत नव्हते. ज्या मुलीसाठी आपण आपलं सर्व आयुष्य खर्च केलं, त्या बदल्यात तिनं अशी भरपाई करावी हे अनपेक्षित होते. आपणच तिच्यावर अधिक चांगले संस्कार करण्यात कमी पडलो असा विचार करून तो स्वताला दोष देऊ लागला होता.

नवीन लग्न झाल्याने पाहुण्यांची वर्दळ वाढली होती. नोकरी सांभाळून त्यांचा पाहूणचार करताना अमृताला तारेवरची कसरत करावी लागत होती. तिचे सासू-सासरे पगारदार व पडेल ते काम करणारी सून मिळाल्याने आनंदी होते.

म्हणतात ना नवरीचे नऊ दिवस तसे विक्रम सुरुवातीला तिची खूप काळजी घेत होता. त्यामुळे अमृताला आपण अगदी योग्य जोडीदार निवडल्याचा अभिमान वाटत होता.

विक्रम व अमृता कुलू मनाली येथे हनिमूनसाठी गेले. त्याचा पूर्ण खर्च अमृताने केला होता. तिकडून आल्यावर विक्रमने नोकरी किंवा कुठे तरी कामधंदा करावा असा आग्रह मात्र ती धरत होती. तो सुद्धा होकार देऊन तिच्या पैशावर मजा मारत होता.

सदूबाला जणू काही एखादा गंभीर आजार झाला असावा अशी त्याची तब्येत खराब झाली. परंतु तो काही दवाखान्यात जायचे नाव घेत नव्हता. शेजारी तसेच स्वताची पत्नी यांनी अनेकदा आग्रह करूनही तो अमृताच्या लग्नाची गोष्ट विसरायला तयार नव्हता.

या आजारपनात सदूबा एक दिवस हे जग सोडून कायमचा निघून गेला. त्याच्या अंत्यविधिला अमृता येऊ शकली नाही. खरे तर तिला विक्रमने हि खबर तिच्यापासून लपवली होती.

विक्रम चार पाच दिवस एखाद्या कंपनीत कामाला जायचा. परंतु कामाची सवयच किंवा मानसिकता नसल्याने तो त्यापेक्षा अधिक काळ कामावर टिकत नव्हता. त्याचा संपूर्ण खर्च अमृताच्या पगारातून होत होता.

हळूहळू तिला त्याच्या व्यसनांविषयी माहिती होत होती. त्यावरून त्यांच्यात अनेकदा वाद होत होते. या वादात तिचे सासू सासरे मुलाचीच बाजू घेत असल्याने तिची खूप चीडचीड होत होती.

लग्नानंतर घरातले कोणीही बाहेर कामाला जात नव्हते कि घरातील कोणतेही इतर काम करत नव्हते. संपूर्ण कामाचा ताण तिच्यावर आल्याने आता तिला आपल्या आई वडिलांची आठवण येऊ लागली होती. तिने किर्तीला आपली घुसमट बोलून दाखविली.

कीर्तीने लगेच आंबेवाडीला संपर्क केला. तेव्हा तिला समजले कि अमृताचे वडील सदूबा काका कधीच मृत्यू पावलेले आहेत. तसाही निरोपही विक्रमला दिला होता. परंतू का कुणास ठाऊक त्याने ती वार्ता अमृतापासून लपवली होती.

कीर्तीचे डोळे पाणावले होते. मन भरून आले होते. तिने आईचा तपास केला, तर आई कुठे नातेवाईकाकडे गेलेली आहे. पण नेमकी कुठे हे मात्र समजू शकले नाही. अमृताच्या एका निर्णयाने संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले होते याची जाणीव तिला होत होती. आता तिला क्षणाचाही विलंब न करता हि खबर अमृताला द्यायची होती.

अमृताचे कॉलेज सुटायला अजून अर्धा तास बाकी होता. कीर्ती कॉलेजच्या स्टाफरूमजवळ तिची वाट पाहू लागली. कॉलेजची काही मुले व मुली बाहेर ऑफ तासाला कट्टयावर गप्पा मारत होते. त्यांच्या हसण्यात तिला अमृताचे स्मित दिसत होते. अशीच ती सतत हसायची. ते हसणं, ते जगणं तिच्या आई वडिलांनी जपलं होतं याची पुसटशी कल्पना कीर्तीच्या मनात डोकावत होती.

कॉलेज सुटल्याची घंटा वाजली आणि तिच्या विचारचक्रात खंड पडला. ती अमृताची मोठ्या आतुरतेने वाट पाहू लागली. कॉलेजचे विद्यार्थी एकच घोळका करून बाहेर पडत होते. काही प्राध्यापक मंडळी किर्तीला येताना दिसत होते, परंतु त्यांच्याकडे तिचे लक्षच नव्हते.

तिला दुरूनच अमृता येताना दिसली. खाली मान घालून चालताना तिला हिने कधी पाहीले नव्हते. नेहमी हसत, उत्साही असाच चेहरा तिचा हिला माहित होता. ती जसजशी जवळ येत होती, तिच्या अंतर्मनात डोकावन्याचा प्रयत्न कीर्ती करत होती. पण आज तिला ते जमत नव्हते.

“अमृता कुठे हरवली आहेस?” कीर्तीने न राहवून दुरूनच हटकले.

अमृताला आपल्याशी कुणीतरी बोलत आहे याची जाणीव व्हायला वेळ लागला.

“ये अमृता, हे आमरे, जरा वर बघ. खाली काय शोधत चालली आहेस?”

आता मात्र ती भानावर आली होती. कीर्तीचा आवाज तिने ओळखला होता.

“काही नाही गं. असंच बोलून बोलून जरा थकवा आलाय म्हणून.”

“ते जाऊ दे. चल मला तुझ्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे.” कीर्तीने पटकन तिचा हात पकडला व तिला ओढतच जवळच एका निवांत झाडाखाली नेले.

कीर्तीने अमृताला तिच्या आई वडिलांचे काय झाले ते सारं काही क्षणाचाही विलंब न लावता सांगून टाकले. आपल्या वडिलांच्या मृत्यूची बातमी विक्रमने आपणास न सांगितल्याने अमृताला विक्रमविषयी तिचे वडील जे सांगत होते ते सर्व खरे असल्याची खात्री पटत होती.

आता वेळ निघू गेली होती. आपली आई कुठे असेल या चिंतेने तिचं सारं अंग गळून गेलं होतं. कीर्ती तिला सावरण्याचा प्रयत्न करत होती. खूप खूप रडावं असं अमृताला वाटत होतं, परंतु कॉलेज असल्याने तिनं स्वताला आवरलं होतं.

आज अमृताला घरी जावं असं वाटत नव्हतं. किर्तीला तिने काम असल्याने थोडावेळ थांबावे लागणार असल्याचा बहाणा सांगितला व तिला जायला सांगितले. तिने स्वतःला आपल्या स्टडीरूममध्ये कोंडून घेतलं व खूप रडली. रडून तिचे डोळे लाल झाले होते. आता पुढे काय या विचारात तिने जुनी पुस्तके चाळायला सुरुवात केली.

असंच एक जुनं पुस्तक चाळताना तिच्या नजरेत एक वाक्य आलं. ते होतं, ‘सर्वच सुंदर चेहरे मनाने चांगलेच असतात असे नाही.’

काहीशा उशिराने अमृता घरी जायला निघाली. तिला विक्रमचा चेहरा वारंवार आठवत होता व तिचा राग अनावर होत होता. परंतु कितीही राग आला तरी ती असहाय होती. तिच्या बाजूने बोलणारं घरात कोणीही नव्हतं.

घरात सर्वजण तिचीच वाट पाहत होते. उशीर का झाला म्हणून विक्रम ओरडत होता, तर सासू स्वयंपाक कोण करणार म्हणून आदळ आपट करत होती. अमृता कोणाशी काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. परंतु तिची मानसिकता समजून घेणारे तिथे कोणीही नव्हते. सासरा थोडासा समाजुतदारपणाचा आव आणत अमृताजवळ आला. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत त्याने हळूच मूळ मुद्दा बोलून दाखवला.

“दत्तुचं लग्न करायचे आहे. तेव्हा आपल्याला पैशाची गरज आहे.”

“मग मी काय करू?” अमृताने उलट उत्तर दिले.

दत्तू हा विक्रमचा सर्वात लहान भाऊ होता. घरात कमावणारे दुसरे कोणीच नव्हते. त्यात यांना शेवटचे लग्न म्हणून जोरदार खर्च करायचा होता.

“तुझ्याकडे असतील तर बघ,” सास-याने लगेच विनवले.

“घरातील सर्व खर्च मी करते. प्रत्येकाला खर्चासाठी मीच पैसे देते. आता कुठून आणू पैसे?” अमृता ओरडली.

सास-याने नरमाईची भूमिका घेत म्हटले, “आपण तुझ्या नावावर बँकेतून दहा लाख रुपये कर्ज काढू.”

कर्ज हा शब्द कानावर पडताच अमृताला आपल्या वडिलांचे शब्द आठवले, “पोरी त्या विक्रमचे तुझ्यावर नाही तर तुझ्या पगारावर प्रेम आहे.”

रात्रीचे जेवण झाले. अमृता एकटीच स्वतंत्र खोलीत झोपायला निघून गेली. तिला आज झोप येत नव्हती. रात्रभर ती सारखी उठून पाणी पित होती. कधी नव्हे ती आज अमृता आपल्या आई वडिलांच्या प्रेमाच्या तहानेने व्याकुळ झाली होती.

रात्रीचा चंद्र आज तिला परका वाटत होती. पण आता त्याचा काही उपयोग होणार नव्हता. कारण स्वताच्या प्रेमासाठी तिनं दोन प्रेमाची माणसं परकी केली होती आणि ती त्यांच्या प्रेमापासून पोरकी झाली होती.



,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
Read my all running stories

(वापसी : गुलशन नंदा) ......(विधवा माँ के अनौखे लाल) ......(हसीनों का मेला वासना का रेला ) ......(ये प्यास है कि बुझती ही नही ) ...... (Thriller एक ही अंजाम ) ......(फरेब ) ......(लव स्टोरी / राजवंश running) ...... (दस जनवरी की रात ) ...... ( गदरायी लड़कियाँ Running)...... (ओह माय फ़किंग गॉड running) ...... (कुमकुम complete)......


साधू सा आलाप कर लेता हूँ ,
मंदिर जाकर जाप भी कर लेता हूँ ..
मानव से देव ना बन जाऊं कहीं,,,,
बस यही सोचकर थोडा सा पाप भी कर लेता हूँ
(¨`·.·´¨) Always
`·.¸(¨`·.·´¨) Keep Loving &
(¨`·.·´¨)¸.·´ Keep Smiling !
`·.¸.·´ -- raj sharma
Post Reply