सामाजिक लैंगिक प्रश्न

Post Reply
User avatar
rangila
Super member
Posts: 5698
Joined: 17 Aug 2015 16:50

सामाजिक लैंगिक प्रश्न

Post by rangila »

सामाजिक लैंगिक प्रश्न


वृत्तपत्रातलं प्रश्नोत्तरांचं सदर ही आता जून झालेली गोष्ट. आरोग्य,कायदा अशा एकेका विषयाला वाहिलेली किंवा निव्वळ टाईमपास म्हणून येणारी ही सदरं तज्ज्ञ आणि ग्लॅमरस व्यक्तींचा खास प्रांत. या सदरातून प्रत्येक वेळी निव्वळ टाईमपास म्हणूनच लोक प्रश्न विचारतात असं नाही. अनेकदा हे प्रश्न गंभीरही असतात. पण या गंभीर प्रश्नांचीही फारच जुजबी आणि चटपटीत उत्तरं दिली जातात. लोकांचे प्रश्न विविध असतात. कोणत्याही एकाच विषयाच्या चौकटीत किंवा उत्तरातून या सर्वच प्रश्नांना न्याय मिळण्याची शक्यता नाही. यावरचा मार्ग म्हणून आम्हीच असं एक सदर चालवायचं ठरवलं. लोकांना खरोखरच गंभीर प्रश्नांना गंभीर उत्तरं हवी असतील तर त्यांनी आमच्याकडे प्रश्न पाठवावेत, आम्ही त्या प्रश्नांना या सदरातून उत्तरं देऊ असं आवाहन आम्ही आमच्याशी संलग्न असणा-या वृतपत्रांतून केलं. वेगळ्या पद्धतीने हे सदर चालवण्याचा आमचा प्रयत्न केवळ लोकांच्या प्रतिसादावर अवलंबून होता.

हळूहळू पत्रं यायला लागली. या पत्रांतले प्रश्न म्हणजे काहीही होते. विविधरंगी साबणांचा ङ्गेस पांढराच का होतो? सूर्यग्रहण पाहताना काय काळजी घ्यायची? इथपासून ते सातबा-याचे उतारे मिळवताना काय करायचं इथपर्यंत अशी प्रश्नांची धमाल व्याप्ती होती. एका प्रश्नकर्त्याने तर प्रलय केव्हा होणार अशीही विचारणा केली होती. पत्रांचे हे ढीग पहात असताना एक गोष्ट जाणवायची, की दर दहा पत्रांमागे दोन-तीन पत्रं तरी लैंगिक विषयांशी संबंधित आहेत. पहिल्यापहिल्यांदा हे प्रश्*न आम्ही बाजूला काढून ठेवले. नंतर पाहता येईल म्हणून! पण या पद्धतीची पत्रं वाढायलाच लागली. प्रश्न नेहमीचेच. लिंगाचा आकार लहान असणं, स्तन मोठे किंवा लहान असणं, मासिक पाळीतली काळजी आणि समलिंगी संभोगाचे दुष्परिणाम याची विचारणा अशा स्वरूपाचे. नव्याने भर पडली असलीच तर ती एड्*सविषयक प्रश्नांची होती. विशेषत: मुलींनी आणि महिलांनी विचारलेले प्रश्न विलक्षण खरे आहेत हे वाचताक्षणीच जाणवायचं. लैंगिकतेविषयीचे गैरसमज, लहानपणापासून झालेले संस्कार, प्रत्यक्ष जगताना समोर आलेल्या समस्या, जिज्ञासा आणि कुतूहल ही कारणं प्रश्न विचारण्यामागे असावीत. शाळा, महाविघालयं, घर यापैकी कुठेच विचारता न आलेल्या आणि आजवर मित्र-मैत्रिणींमध्येच कुजबुजीच्या स्वरूपात असणा-या या प्रश्नांना लेखी स्वरूप मिळालं होतं. हे प्रश्न विचारणारे बहुतेकजण तरुण वर्गातले आहेत हे त्यांचे प्रश्न वाचून लक्षात यायचं. काही पत्रं नवविवाहितांचीही होती. प्रश्न विचारणा-या या तरुण-तरुणींचा वयोगट पंधरा ते पंचवीस असा. लोक प्रश्*न विचारून मोकळे झाले, पण आमच्यासमोर प्रश्न होता, या प्रश्नांचं करायचं काय? आम्ही कुणी प्रथितयश लैंगिकतज्ज्ञ नव्हे. शिवाय आजवर या अशा प्रश्नांना आम्ही कधीही प्रसिद्धी दिली नव्हती. पण म्हणून प्रश्न यायचे थांबले नव्हते. एकदा वाटलं, एखाघा लैंगिक तज्ज्ञांकडे हे प्रश्न घावेत. पण हा नेहमीचाच मार्ग झाला आणि तो काय केव्हाही अंमलात आणण्याजोगा होता. मग या प्रश्नांचं करायचं काय?

प्रश्नांचा रेटा

नाशिकच्या एका तरुण प्रश्नकर्त्यानेच ही कोंडी फोडायचा प्रयत्न केला. त्याने समलिंगी संभोगाबाबत प्रश्न विचारला. ‘दोन समलिंगी व्यक्तींनी (पुरुष) परस्परांशी अनेक वेळा संभोग केला तर ज्या व्यक्तीवर तो संभोग केला जातो, तिच्यावर त्याचा काय परिणाम होतो? यावर उपाय काय?’ या तरुणाचं त्यानंतरच्या आठवड्यात दुसरं आणि लगेचच्याच आठवड्यात तिसरं पत्रही आलं. शेवटच्या पत्रात तर त्यानं लिहिलं की ‘सर! मी आपणाकडे आत्तापर्यंत तीन वेळा पत्र पाठवून सुद्धा आपण या प्रश्नाचं उत्तर प्रसिद्ध केलं नाही. कृपया या वेळेला आपण माझ्या प्रश्नाचं उत्तर प्रकाशित कराल अशी आशा बाळगतो,’ या तरुणाच्या मनाची घालमेल समजून येत होती. प्रश्न कदाचित व्यक्तिगतही असावा. एका प्रश्नाचा एवढा पाठपुरावा करणारं हे पहिलंच उदाहरण होतं. याच सुमाराला पाच-पाच, दहा-दहा व्यक्तींच्या गटाने विचारलेले प्रश्नही येऊ लागले.

वैविध्यपूर्ण प्रश्नांनी आम्हाला या प्रश्नांकडे उत्तरापलीकडे पाहण्याची दृष्टी दिली.
या संदर्भात आम्हाला पहिल्याप्रथम काय जाणवलं, हे प्रश्न टाळता येणार नाहीत. आजवर या विषयावरच्या पुस्तकातून, काही लेखमालांमधून अशा स्वरूपाचे प्रश्न पाहण्यात आले होते. निखळ शरीरप्रश्*न म्हणून त्यांची सोडवणूकही परिचित होती. हे प्रश्नही तसेच आहेत म्हटल्यावर त्यांच्या सोडवणुकीची पद्धत काही वेगळी असेल असं मानण्याचं कारण नव्हतं. इतर कुणासाठी असले तरी आमच्यासाठी हे प्रश्न निव्वळ शारीरिक नव्हते. महाराष्ट्राच्या शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागातून हे प्रश्न आले आहेत आणि त्यांचं प्रमाणही मोठं आहे. बरेचसे प्रश्न व्यक्तिगत दिसत होते. म्हणजे निव्वळ कुतूहलापोटी आलेल्या प्रश्नांपेक्षा हे वेगळे होते.

सूर्यग्रहणाच्या प्रश्नांचं उत्तर मिळालं किंवा नाही मिळालं तरी चालण्यासारखं होतं. तथापि शिश्नाची लांबी कमी असणं किंवा स्तन लहान असणं हे त्यांच्या दृष्टीने निव्वळ कुतूहल नव्हतं. त्यांच्या रोजच्या जगण्याशीच संबंधित असे हे प्रश्न असणार. म्हणूनच एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जात होता. ब-याच पत्रात ‘तुमची थट्टा करण्यासाठी हा प्रश्न आम्ही विचारत नाही’ अशी वाक्यं आहेत. ‘या प्रश्नाने मला वेडं केलं आहे’ हे वाक्य तर अनेक पत्रांत आहे. पत्रातल्या घाई-घाईने काढलेल्या अक्षरावरून, प्रश्नांच्या विस्कळित मांडणीतून किंवा प्रश्न नीट समजावून सांगण्याच्या पद्धतीतून या पत्रांकडे दुर्लक्ष करावं असं वाटत नव्हतं. प्रश्नकर्त्यांबद्दल वाटणा-या आस्थेतूनच प्रस्तुत लेख लिहिण्याला गती मिळाली. या दृष्टीने काही पत्रं पाहण्यासारखी आहेत.
‘मी बारावी सायन्समध्ये शिकते. मी दिसायला खूपच सुंदर आहे. परंतु माझे स्तन खूपच मोठे आहेत. मलाही जड वाटतात. माझ्या काही मैत्रिणी म्हणतात की, प्रेमसंबंधांमुळे, संभोगामुळे असं होतं. असे संशय माझ्याविषयी घेतले जातात. कृपया त्यावर काही उपाय सांगावा.’

‘आम्ही आपले सदर वाचून आनंदी झालो आहोत. या आधी काही पत्रे आम्ही आपणास पाठवली. त्याची उत्तरेही वाचली. असाच एक प्रश्न आम्ही देत आहोत. स्वप्नदोष कशामुळे होतो? त्याचे फायदे-तोटे काय?’
‘मी हस्तमैथुनाची सवय सोडण्यासाठी बरेच उपाय केले पण निरर्थक. मला पंधरा वर्षांपासून ही सवय आहे.. प्रथम मी हे रोज करत असे. पण काही ठिकाणी पुस्तकात वाचून असं समजलं, की यामुळे वीर्यनाश होतो. त्यामुळे सोडण्याचा प्रयत्न केला. पण दोन दिवसानंतर शिश्न दुखू लागले. यावर काय उपाय आहे हे त्वरित कळवणे. कारण मला खूप काळजी लागून राहिली आहे.’

अनेक पत्रातले प्रश्न व्यक्तिगतही नाहीत. कुत्रा-कुत्रीच्या संभोगासंदर्भातले किंवा प्राण्याचं वीर्य स्त्रीच्या शरीरात घातलं तर होणारं बाळ कसं असेल असे प्रश्न निव्वळ हसण्यावारी नेण्याजोगे नाहीत. यातूनच पुढच्या लैंगिक विषयातल्या समज गैरसमजांचा जन्म होणार हे उघड. प्राण्याचं वीर्य स्त्रीला दिलं तर काय होईल हा प्रश्नही तसाच. माकडाने स्त्रीवर बलात्कार केल्यानंतर झालेल्या बाळाविषयीच्या ग्रामीण जीवनातल्या अनेक कथा आम्हाला आठवल्या. कामविकृतींचा जन्म असाच होत नसेल ना! अशीही शंका आली. साधारणपणे वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षांपासून हे प्रश्न पडत असतील असं मानलं, तर प्रश्न विचारणा-या या तरुण-तरुणींच्या विवाहापर्यंत म्हणजे जवळजवळ तितकीच वर्षं या प्रश्नांना उराशी कवटाळून जगणा-या माणसांचं नक्की काय होत असेल आयुष्यात? काहीतरी करून दाखवण्याचा हा काळ असा प्रश्नग्रस्त असणं म्हणजे भयंकरच! असे अनेक प्रश्न समोर आले. मग वाटायला लागलं की गेल्या बारा-पंधरा वर्षांत प्रबोधनाचे प्रयत्न झाले म्हणजे नेमकं झालं काय?

पूर्वीचे प्रयत्न
हे प्रश्न दाबून टाकायचे किंवा नाहीसे करायचे तर ब्रह्मचर्यापासून ते फ्री सेक्सपर्यंत अनेक उपाय आजवर मांडले गेले आहेत. अगदी नव्या पद्धतीने बालविवाहाचा उपायही सुचवून झाला आहे. तरुण वयातल्या या भावना दडपून टाकायचा ब्रह्मचर्यासारखा मार्ग अशास्त्रीय आहे. पण फ्री सेक्स हा उपायही काही खरा नव्हे. ज्या पाश्चात्य देशात हे प्रकार चालतात तिथे लग्नाआधी दिवस जाणं, बलात्कार, खून, नशील्या पदार्थांचं सेवन या आणखीनच गंभीर समस्या तयार झाल्या आहेत. बालविवाह करू म्हणावं, तर या देशात आजही गरोदर स्त्रियांच्या पोटाला टिळा लावायची पद्धत आहे. म्हणजे या उपायांनी हे प्रश्न काही कमी होणार नाहीत. शास्त्रीय माहिती आणि भारतीय नैतिकता यांच्या मिश्रणातून या प्रश्नावर विविध उपाय करून झाले. पुस्तकं लिहिली गेली. व्याख्यानं दिली गेली. शिबिरं घेतली गेली. वृत्तपत्रातून लेखमाला लिहून झाल्या. तरीही प्रश्न वाढतच आहेत. नवनव्या प्रसारमाध्यमांच्या रेट्याने तर प्रश्नांच्या स्वरूपात दिवसेंदिवस वाढच होणार आहे. या नव्या बदलांना शास्त्रीय माहिती अधिक अमूर्त नीतिकल्पना हा फॉर्म्युला कसा काय उपयोगी पडणार? तरुणांची आयुष्यं पोखरणारे हे प्रश्न काही वेगळ्या पद्धतीने विचारात घ्यायला हवेत. तज्ज्ञांनी या प्रश्नांकडे नव्या दृष्टिकोनातून पहायला हवं. पालक, शिक्षक यांची याबाबत काहीतरी ठोस भूमिका ठरवली जायला हवी.

विचारवंतांनीही या विषयाला वर्ज्य मानता कामा नये. असं काय काय डोक्यात यायला लागलं. मग ठरवलं, की या भानगडीचा शोधच घ्यायचा. फार पूर्वीपासून नाही तरी गेल्या दहा-पंधरा वर्षात याबाबत झालेल्या प्रयत्नांचा आढावा घ्यायचा. त्यासाठी या क्षेत्रातल्या तज्ज्ञांची मदत घ्यायची. सामाजिक कार्यकर्ते याबाबत काय विचार करतात हेही पहायचं.
पंधरा वर्षापूर्वी काय प्रश्न होते हे पाहण्यासाठी आम्ही डॉ. विठ्ठल प्रभू यांच्या ‘निरामय कामजीवन’ या प्रसिद्ध पुस्तकाचा आधार घेतला. त्यांच्या पुस्तकातल्या ‘संभोग : काही प्रश्नोत्तरे’ आणि ‘कामजीवन : काही अपसमज’ या प्रकरणातून याबाबत माहिती मिळाली. लोकांच्या लैंगिक समस्यांबाबत माहिती देताना डॉ. प्रभू म्हणतात, ‘कामाविषयीची माहिती विचारणं हे सदभिरूचीला सोडून आहे, अशी समजूत असल्याने आपल्याकडील बहुसंख्य तरुण भीतीच्या छायेत वावरत असतात. गुप्तरोग व हस्तमैथुनासंबंधीच्या भावना या आपल्या देशातील तरुणांच्या मुख्य समस्या आहेत. स्त्रीच्या मनात संभोगाविषयी भीती असल्यामुळे ‘योनि आकर्षण’ या आपल्याकडे सर्वसामान्य समस्या आहेत. अवास्तव अपेक्षा बाळगणारे काही आंबटशौकीन वगळले तर बहुसंख्य समाज हा पोटापाण्याच्या विवंचनेत असतो. काही बळी घायची वेळ आलीच तर तो कामजीवनाचा बळी देतो. नपुंसकत्व,शीघ्रपतन या पुरुषांच्या समस्या अस्तित्वात असल्या,तरी त्याकडे त्याचं फारसं लक्ष जात नाही. काही सुशिक्षित, सुसंस्कृत व सुस्थितीतील व्यक्तींना या समस्यांची जाण येते खरी; पण त्यासाठी उपाय काय व कुठे आहेत हे माहीत नसतं किंवा संकोचामुळे हे दांपत्य समस्यांना तोंड देत तसंच जगतं.’

डॉ. प्रभू यांनी त्यांना या संदर्भात आलेली काही पत्रंही उदाहरणादाखल दिली आहेत. त्यातून या विषयातल्या गैरसमजांची गंभीरता लक्षात येते. या गैरसमजांमुळे लग्नाच्या पहिल्या रात्रीच घटस्फोटाची किंवा आत्महत्या केल्याची करूण उदाहरणंही या पुस्तकात आहेत. पौगंडावस्थेतल्या मुला-मुलींचे सेक्सविषयक गैरसमज कमी करायचे असतील तर व्यापक पातळीवरील कामशिक्षण मिळणं डॉ. प्रभू यांना गरजेचं वाटतं.
डॉ. प्रभू यांच्या या मांडणीला आज जवळजवळ पंधरा वर्षं झाली. थोडक्यात पाणी बरंच वाहून गेलंय. मग पूर्वीपेक्षा हे प्रश्न बदलले की नाही,चित्रपट व अन्य प्रसारमाध्यमांच्या प्रभावाने हे बदल नेमके काय झाले,यासंबंधी इतर तज्ज्ञांचीही मदत आम्ही घेतली.
तज्ज्ञ काय सुचवतात?

डॉ. ए. जी. साठे व त्यांच्या पत्नी शांता साठे या दोघांचाही लैंगिक शिक्षणाच्या क्षेत्रातला दीर्घ अनुभव सर्वांनाच ठाऊक आहे. ‘सेक्स एज्युकेशन’ हा शब्द प्रचारात येण्यापूर्वीच डॉ. साठे पती-पत्नींनी ‘फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया’ या पद्धतीच्या कामाला सुरुवात केली. डॉ. साठे हे या संस्थेचे एक संस्थापक आहेत. हे दांपत्य आमच्याकडे आलेल्या प्रश्नांवरच केवळ बोललं एवढंच नाही, बदल होत गेला याचा पटच त्यांनी उलगडून दाखवला.

‘आमची फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन’ ही संस्था १९६६ साली अस्तित्वात आली. त्या काळात सेक्स एज्युकेशन हा शब्द देखील आम्हाला उच्चारता येत नव्हता. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला प्रकाशित झालेल्या काही चरित्रांमधून,आत्मचरित्रांमधून हस्तमैथुनाचे उल्लेख सापडतात. आपल्याकडे ‘कामसूत्रा’सारखे ग्रंथ होते पण ते नावापुरतेच. बाकी सगळा अंधारच होता. आम्ही जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा र. धों. कर्वे हीच नाव घेण्याजोगी व्यक्ती होती. त्यांच्यानंतर य. गो. नित्सुरे. नित्सुरे यांनी ‘कुमारांचा सोबती’ या नावाचं फार चांगलं पुस्तक लिहिलेलं होतं. १९५९-६० साली स्त्री मासिकात ‘इंद्रधनूचा पूल’ या नावाने एक लेखमाला प्रसिद्ध झाली. या लेखमालेच्या लेखिका फिरोज आनंदकर होत्या. १९७० नंतर ‘मनोहर’ मधून हस्तमैथुनाबाबत चर्चाही येऊन गेली. अपु-या जागेमुळे वैवाहिक सुख उपभोगता येत नाही हे मध्यवर्ती कथासूत्र कल्पून ‘मुंबईचा जावई’ हा चित्रपट याच सुमाराला आला. पण तरीही त्या विषयातल्या शास्त्रीय माहितीचा प्रसार व्हायचा आहे हे आमच्या लक्षात आलं. विशेषत: मास्टर्स ऍण्ड जॉन्सन यांचं नवं संशोधन, पाश्चात्य देशात त्यामुळे झालेली उलथापालथ, या विषयावरची त्यांची पुस्तकं यापैकी फारच थोड्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचल्या होत्या. गायनॅकॉलॉजिस्ट आणि सायकिऍट्रिस्ट यांच्या पलीकडे काहीतरी व्याप्ती असलेला हा प्रश्न आहे हे सर्वांनाच कळून चुकलं. मग आम्ही हे काम हाती घ्यायचं ठरवलं. १९६६ ते १९७६ या दहा वर्षांच्या काळात आम्हाला शाळा-कॉलेजात प्रवेशही नव्हता. त्या काळात लोकांना केवळ प्रजोत्पादनाचीच माहिती होती. डॉक्टरही वैवाहिक आयुष्यातल्या अडचणींवर मात करता आली नाही, की मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेत. पाश्*चात्य देशातल्या नव्या संशोधनामुळे १९७६ साली राष्ट्रीय पातळीवर या विषयातलं एक वर्कशॉप झाल्यानंतर या विषयाला तोंड फुटलं.’

‘या विषयाचं शिक्षण घायला आम्ही जेव्हा सुरुवात केली, तेव्हा आम्ही काहीही शिकवत नसू. लोकांना प्रश्न विचारायला सांगत असू. त्यातूनच आम्हाला लोकांना नेमके काय प्रश्न आहेत, ते या विषयाचा विचार कसा करतात हे लक्षात येऊ लागलं. ‘इन्डिव्हिज्युअल कौन्सिलिंग’ ही आम्ही सुरू केलं. एकदा अशीच एक केस आमच्याकडे आली. लग्नानंतर पत्नी शरीरसंबंधाला तयार नव्हती. तिला तो प्रकार घाणेरडा वाटत होता. तिचं म्हणणं की माझे आई-वडील असं वागत नव्हते. मी तरी पाहिलेलं नाही. मग आम्ही तिला म्हटलं की तुझे आई-वडील असे वागत नव्हते तर तुझा जन्म कसा झाला हे सांग? हळूहळू ती कनव्हिन्स होत गेली. अशा अनुभवातूनच आम्ही दोघं विशेषत: मी शिकत गेले.’ श्रीमती साठे म्हणाल्या. या पती-पत्नींचा आणखी एक विशेष म्हणजे त्यांची स्वच्छ आणि स्पष्ट भाषा. नाक, कान, घसा याप्रमाणेच लैंगिक विषयाची, त्यातील आजारांची चर्चा व्हावी असं आपण म्हणतो. पण ही चर्चा कशी असते हे पहायचं असेल तर डॉ. साठे यांच्या व्याख्यानांना वा शिबिरांना उपस्थित रहायला हवं. अशा थेट भाषेमुळेच मुलं आपल्याशी मोकळेपणाने बोलतात का या प्रश्नावर डॉ. साठे सहमत होत म्हणाले, ‘थेट, सोपी आणि शास्त्रीय भाषा वापरायची, विनोद न करता बोलायचं हे पथ्य आम्ही पहिल्यापासून आजतागायत पाळलेलं आहे. यामुळेच आमच्या संस्थेतर्फे स्त्रियाच प्रशिक्षण काम करत असूनही आम्हाला अडचण आली नाही. व्याख्यानाच्या वेळी मुलं हसली तर आम्ही हसू देतो पण मूळ मुद्दा सोडत नाही. हळू हळू आम्ही सुरुवातीची प्रश्नोत्तरांची पद्धत बंद केली. त्याऐवजी व्याख्यानं घायला सुरुवात केली. व्याख्यानाच्या शेवटी एक प्रश्नावली उपस्थितांना घायची व ती भरून घ्यायची असा उपक्रम सुरू केला. या प्रश्नावलीतून लोकांचे प्रश्न काय आहेत हे आम्हाला समजलं. त्यानुसार आमची व्याख्यानं ठरू लागली. मुखमैथुन, समलिंगी संभोग, हस्तमैथुन, लिंगाचा आकार, बॉडी इमेज हेच प्रश्न तरुण वर्गाला प्रामुख्याने जाणवले. हे प्रश्न सोडवायचे असतील तर प्रामुख्याने पौगंडावस्थेतल्या मुलांचं शिक्षण होणं गरजेचं आहे हे आमच्या लक्षात आलं. हा वर्ग डोळ्यापुढे ठेवून आमची प्रशिक्षण पद्धती तयार झाली. शाळा आणि कॉलेजातही प्रमुखांच्या कलाने आमची प्रशिक्षण घायला सुरुवात केली. या प्रशिक्षणातून आम्हाला खूप अनुभव मिळाले. खेडसारख्या तालुक्याच्या गावी एका डॉक्टरनेच आम्हाला विचारलं की, ‘मी हाँगकाँगला गेलो होतो तिथे अर्धा पाऊण तास संभोग चालतो असं ऐकलं. हे शक्य आहे का?’ तिथल्या मुलांनाही हा प्रश्न होता. असंच एकदा आम्ही कोल्हापूरला गेलो. तिथल्या एम. एस. डब्ल्यू.च्या मुलींसाठी आम्हाला व्याख्यान घायचं होतं. व्याख्यान संपल्यावर काही मुलींनी केवळ श्रीमती साठे यांच्याशी बोलायची इच्छा व्यक्त केली. श्रीमती साठे यांच्याशी त्या काय बोलल्या तर लग्नानंतर पहिल्या रात्री नेमकं काय होतं? आम्हाला भीती वाटते. त्यांच्यावर सिनेमातल्या दृश्यांचा प्रभाव होता हे नंतर लक्षात आलं. अशीच एक एम. एस. डब्ल्यू. झालेली मुलगी व्याख्यानानंतर आमच्याकडे आली. ती विवाहित होती. आम्हाला भेटून ती म्हणाली की, ‘तुम्ही आता जे सांगितलंत ते मलाही ठाऊक नव्हतं. माझा नवरा शहाणा निघाला म्हणून बरं!’ असंच एकदा आम्ही एका शिबिरासाठी वर्ध्याला गेलो होतो तेव्हाची गोष्ट. तिथे काही मुलींचा वेगळाच प्रश्न होता. त्यातली एक म्हणाली, ‘माझा प्रियकर माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करतो. त्याला नकार दिला तर तो मला सोडून जाईल. तेव्हा मी काय करू?’ काहीसे वेगळ्या स्वरूपाचे म्हणून हे प्रश्न सांगितले. एरवी मुलांचे प्रश्न हस्तमैथुन व बॉडी इमेजबाबत असतात तर मुलींचे प्रश्न मासिक पाळी आणि संभोगाची भीती याच स्वरूपाचे असतात. त्या अर्थाने आजही या प्रश्नांमध्ये काही बदल झालेला नाही. पहिल्यापासून हे प्रश्न ‘परवानगी मागणारे’असेच राहिले आहेत. हस्तमैथुन करणं अपायकारक नाही हे डॉक्टरांनी म्हणावं अशी प्रश्न विचारणा-यांची इच्छा असते. मुलांना आपण आजवर किती मुली फिरवल्या हे सांगण्यात फुशारकी वाटते तर मुलींना आपण कितीजणांना नकार दिला हे सांगताना मोठेपणा वाटतो. शेवटी दोघंही आपापला इगो जपतात.’

‘प्रसारमाध्यमांचा खालावलेला दर्जा व वाढता प्रभाव यामुळे प्रश्न काहीसे बदलेले दिसतात. मोह, मैत्री, प्रेम, जोडीदाराची निवड या विषयांवर ही मुलं-मुली आता प्रश्न विचारू लागली आहेत. फ्रेंडशीप कशी मागायची हा प्रश्न गोव्यातल्या अनेकांनी आम्हाला विचारला. प्रेमाविषयीही मुला-मुलींच्या मनात गैरसमज आहेत हे त्यांच्याशी बोलताना जाणवतं. हल्ली लग्नाचं वय वाढल्यामुळे मनावर ताबा कसा ठेवायचा असंही विचारलं जातं. श्रृंगारात बाईला काहीतरी स्थान आहे हेही हळूहळू जाणवतंय. बदल असेल तर तो एवढाच आहे. बाकी जुनंच कायम आहे.’

‘आमचा उद्देश हा विषय ‘बेडरूम’ बाहेर आणणं हाच आहे. म्हणून हा सर्व खटाटोप. तरुणवर्गाला निव्वळ माहिती देऊन थांबावं असं आम्हाला वाटत नाही. पाश्चात्य देशात असे प्रयत्न झाले. ‘बायो मेडिकल एज्युकेशन’ असं त्याचं नाव होतं. पण त्यातले भयंकर धोके त्यांना जाणवले. नंतर त्यांनी ती संकल्पना आणि शब्द दोन्हीही टाकून दिलं. आज ते ज्या मूल्य कल्पनांचा आग्रह धरत आहेत त्याच दृष्टिकोनातून आम्ही पूर्वीपासून काम करत आलो आहोत. एवढंच नव्हे तर लैंगिक शिक्षण हे ‘मूल्यभारित’(व्हॅल्यूलोडेड) नव्हे तर ‘मूल्यप्रेरित’ (व्हॅल्यू ओरिएंटेड) असावं असं आम्ही म्हणतो. आजच्या काळानुरूप प्रशिक्षणाची पद्धत हवी तर ती वेगवेगळ्या चार टप्प्यांवरच्या व्याख्यानाची असेल, या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. पालकांचा सहभाग जास्त असावा या दृष्टीने आमचे प्रयत्न वाढत आहेत!’

डॉ. साठे पती-पत्नी हा विषय ‘बेडरूम’ बाहेर आणू इच्छितात. अशा पद्धतीने या विषयावर चर्चा घडवून आणण्याचे प्रयत्न झाले आहेत. डॉ. लीना मोहाडीकर यांचं नाव या संदर्भात आवर्जून घ्यावं लागेल. १९८१ साली त्यांनी दै. महाराष्ट्र टाईम्समध्ये या विषयावर लेखमाला लिहून अशीच व्यापक चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. बारा-पंधरा वर्षांच्या अनुभवाच्या आधारे आमच्याकडे आलेल्या प्रश्नांसंदर्भात त्या म्हणाल्या, ‘तुमच्याकडे जे प्रश्न आले आहेत त्यात आणि आजवर माझ्याकडे येणा-या प्रश्नांमध्ये फार फरक नाही. हस्तमैथुन, लिंगाचा आकार, वेश्यागमन याच स्वरूपाचे प्रश्न तरुण वर्गाकडून मलाही विचारले जातात.

विवाहित लोकांचे प्रश्न लिंगाची ताठरता, शीघ्रपतन याबाबत असतात. मी व्यवसायाला सुरुवात केली तेव्हा स्त्रिया स्वत:हून येत नसत. अगदीच क्वचित यायच्या. आज मात्र ती परिस्थिती नाही. सेक्स ऑरगॅझम नसणं, नव-यात काहीतरी दोष असणं, याबाबत त्या बोलतात. पण आजही संभोग कसा करायचा हेच ठाऊक नसणा-यांची वैवाहिक आयुष्य ‘उत्तम’चालू असल्याची अनेक उदाहरणं मला ठाऊक आहेत. तुम्ही ज्या वर्गाच्या प्रश्नांची चर्चा करत आहात त्याचा अनुभव मी गेली बारा वर्ष घेत आहे. व्याख्यानानंतर जे प्रश्न लेख स्वरूपात येतात तेव्हा अडचणींची कल्पना येते. हे प्रश्न लेखी विचारणा-यांमध्ये मुलींचं प्रमाण मोठं आहे. मासिक पाळी,त्यात होणारा त्रास,मुलं कशी होतात, जुळं म्हणजे काय,लग्नाआधी वा नंतर शरीरसंबंध ठेवले तर नव-याला कळेल का, योनिपटल म्हणजे काय? लग्नाआधीही ते फाटू शकतं का? असे विविध प्रश्न त्या विचारतात. याचाच अर्थ मुलींना मासिक पाळीमुळे थोडीफार माहिती मिळते हा आपला समज चुकीचा आहे. आजवरच्या माझ्या अनुभवानुसार शहरी आणि ग्रामीण भागातले प्रश्न काही वेगळे आहेत असं वाटत नाही. उलट ग्रामीण भागात लैंगिक व्यवहार तुलनेने सहजगत्या व लवकर करता येत असल्याने तिथे वेगळेच प्रश्न निर्माण होतात.’

‘आज काळ बदललाय म्हणून प्रश्न बदललेले नाहीत. हे प्रश्न एवढ्या वर्षानंतरही का बदलले नाहीत असं जर कुणी विचारलं तर मी म्हणेन की ही चर्चा सुरू होऊन एवढा कमी काळ लोटला आहे आणि एवढ्या कमी लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत की हा बदल होणं शक्यच नाही. पण प्रश्न बदलले नसले तरी या विषयाशी संबंधित अनेक बदल झाले आहेत. ते आशादायक आहेत. १९८१ साली माझी लेखमाला छापायला कोणतंही वृत्तपत्र तयार नव्हतं. विषय चांगला आहे. पण आम्ही तो छापू शकणार नाही असं सांगितलं जायचं. वसंत व्याख्यानमालेतील माझ्या व्याख्यानाला प्रचंड प्रतिसाद मिळूनही पुण्यातल्या काही वृत्तपत्रांनी त्याची साधी बातमीही दिली नव्हती. माझ्या पुस्तकांच्या जाहिराती छापायलाही लोक तयार नसत. पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही. सरकारी पातळीवरही हा विषय आज वर्ज्य राहिलेला नाही. हेच वातावरण कायम राहिलं तर नजीकच्या भविष्यात परिस्थिती बदलू शकते.’


‘लैंगिक विषयातले गैरसमज आणि सध्याची परिस्थिती यांचा विचार करताना काही चांगल्या बाजू मी मांडल्या. पण परिस्थिती वाटते तेवढी चांगली नाही. उलट अज्ञान आणि गैरसमजांना खतपाणी घालणारीच आहे. त्यातच खुद्द डॉक्टरांनाच जिथे या विषयाची शास्त्रशुद्ध माहिती नाही तिथे सामान्यजनांचं काय? वीर्यातून सोनं जातं हे जाहीररीत्या सांगणारे अनेक डॉक्टर्स आजही आहेत. ही परिस्थिती बदलायची तर व्यक्तिगत सल्ला, व्याख्यानं, शिबिरं, लेख याच माध्यमांचा वापर करावा असं माझं मत आहे. कारण अघापही या माध्यमांचा पुरेपूर वापर आपल्याकडून झालेला नाही. किशोरावस्था, पौगंडावस्था, विवाहपूर्व व विवाहोत्तर अवस्था असे टप्पे पाडून त्या टप्प्यांवर आपण माहिती घायला हवी. पुन्हा निव्वळ माहिती देऊन चालणार नाही तर त्याला नीतिमत्तेची जोड घायला हवी. लैंगिक शिक्षण म्हणजे निव्वळ माहिती असा आपला दृष्टिकोन राहिला तर पाश्चात्य समाजासारखा आपल्याही समाजात स्वैराचार माजेल. या दृष्टीने शास्त्रीय माहितीला भारतीय नीतिकल्पनांची जोड घायला हवी.’

‘लहान मुलांनी विचारलेल्या प्रश्नांचीही आपण स्पष्ट व सरळ उत्तरं घायला हवीत. तीच तर खरी सुरुवात आहे. यामुळे लैंगिक शिक्षणाची सुरुवात घरातून होते व शाळेत त्याचा पुढचा टप्पा गाठला जातो. लैंगिक शिक्षण म्हणजे तुमच्यातल्या लैंगिक शक्तीचा जबाबदारी व संयमपूर्वक वापर कसा करायचा हे शिकवणं. हे एकदा मुलामुलींच्या मनावर ठसवलं तर प्रश्नांचं स्वरूपही बदलेल आणि त्यांना योग्य दिशाही मिळेल. आज आपल्याकडचं वातावरण वाईट आहे म्हणून भिण्याचं कारण नाही. लैंगिकदृष्ट्या सुसंस्कृत समाज केवळ भारतातच नव्हे तर जगात निर्माण होण्याची गरज आहे. लैंगिक स्वातंत्र्य मिळाल्यामुळे तिकडे तर ही गरज आणखीनच वाढली आहे.’

हे प्रश्न नेमके का उद्भवतात व ते कसे सोडवावेत याबाबत लैंगिक विषयातल्या तज्ज्ञांची ही मांडणी. पण हे प्रश्न केवळ काही विशिष्ट अवयवांपुरते मर्यादित नाहीत. त्यांचा संबंध मानवी मनाशी आहे. प्रत्येक माणसाला त्याच्या आयुष्यात वेगवेगळ्या मानसिक समस्या असतात. तथापि व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने त्यात भिन्नताही असते. पण वर्षानुवर्षं व आयुष्याच्या महत्त्वाच्या कालखंडात एखाघा विशिष्ट वयोगटाला जेव्हा जेव्हा तेच ते प्रश्न पडतात, तेव्हा त्याचा काय परिणाम होतो? मानसशास्त्रज्ञ अंजली पेंडसे यांनी या प्रश्नाचं विवेचन केलं. त्यांच्या मते ‘सेक्सबाबत समाजात अज्ञान असेपर्यंत हे प्रश्न असणारच. मानसशास्त्रीयदृष्ट्या आपल्या मनात कोणतंही कुतूहल निर्माण झालं, की माणूस ते शमवण्याचा प्रयत्न करतो. हे कुतूहल शमवण्याच्या दृष्टीने योग्य साधन मिळालं नाही तर ते प्रश्न तसेच राहणार. आपल्याकडे लैंगिक विषयाबाबतची बंधनं पाहिली तर तरुणांच्या मनातले प्रश्न मग विकृत पद्धतीने शमवले जातात व त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम होतो. माझा अनुभव असा आहे की, अनेक मुलं-मुली लग्न ठरल्यावरच जागी होतात. तोपर्यंत त्यांचं या विषयातलं अज्ञान कीव करण्याजोगं असतं. लग्नानंतरही परिस्थितीत फार फरक पडतो असं नाही. पहिल्या रात्रीबाबतच्या गैरसमजातून आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची कितीतरी उदाहरणं मला ठाऊक आहेत. एक मानसशास्त्रज्ञ म्हणून मी असं सुचवेन की विवाह ठरलेल्यांची वर्कशॉप्स घ्यायला हवीत.’

‘आज तरुण-तरुणींच्या मनातले हे प्रश्न दाबून टाकण्याकडे कल दिसतो. पण या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत तर त्या व्यक्तींच्या मनात गंड निर्माण होतो. आपण नाकारले जात आहोत अशी भावना निर्माण होते. कुतूहल शमलं नाही तर माणसाचं मन विचार करत राहतं. ब-याचदा अशा व्यक्ती स्वत:च्या नादात असतात. त्यांना आत्मविश्वास वाटत नाही. वास्तवापासून दूर जाण्याची त्यांची प्रवृत्ती वाढते. याचा परिणाम त्यांच्या दैनंदिन आयुष्यावर होतो. आपली संपूर्ण क्षमता तो वापरू शकत नाही. थोडक्यात त्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा काळ वाया जातो. आज एकतर्फी प्रेमाचे प्रकार व त्यातून निर्माण होणा-या विकृती वाढीस लागल्या आहेत. प्रेम कल्पनेत देहाचं महत्त्व अवास्तव वाढणं व व्यक्तीचं वस्तूकरण होणं याचं मूळ सेक्सविषयक चुकीच्या कल्पनांमध्येच आहे. या चुकीच्या कल्पना दूर करायच्या असतील तर या प्रश्नांच्या खुल्या चर्चेला प्रारंभ झाला पाहिजे. पालक,शिक्षक,तज्ज्ञ,या सर्वांचीच ही जबाबदारी आहे. विकृती निर्माण होण्याआधीच तिचं मूळ नष्ट व्हावं. आज ही चर्चा मर्यादित आहे. ती व्यापक बनायला हवी. ज्यांना हे प्रश्न आहेत त्या तरुण वर्गाच्याच पुढाकाराने वेगवेगळ्या शाळा महाविघालयातून या विषयाला व्यासपीठ मिळालं तर आज नसणारी समाजमान्यता त्याला मिळेल!’

लैंगिकतेसारखा वरील प्रश्न जसा शारीरिक मानसिक असतो तसा तो त्या पलीकडेही असतो. कोणत्याही प्रश्नाला असणारं सामाजिकतेचं परिमाण याला अधिकच लागू ठरतं. आपल्या समाजात लैंगिक व्यवहाराकडे पाहण्याचा एक पुरुषी दृष्टिकोन आहे. म्हणूनच स्त्री-पुरुष समानता आणि तरुणांच्या कामविषयक कल्पनांचा एकत्रित विचार होणं अत्यावश्यक आहे. लैंगिकता व स्त्री-पुरुष समानता या दोन महत्त्वाच्या गोष्टींचा एकत्रित व दीर्घकाळ विचार करणा-यांमध्ये विघा बाळ यांचं नाव आमच्यासमोर आलं. यासंदर्भात बोलताना त्या म्हणाल्या,‘जितक्या सहजपणे माणसाला भूक लागते तितकीच काम प्रेरणाही स्वाभाविक आहे. प्रत्येक सुदृढ व्यक्तींला एवढंच नव्हे तर मतिमंदानाही ही भावना असते. स्वाभाविक असल्यामुळेच लैंगिक प्रश्नांचा सातत्याने विचार होतो. पण विचार होत असला तरी त्यावर मोकळेपणाने बोलायची सोय नाही. शंकांचं निरसन होतं ते समवयस्कांतच. त्यांनी सांगितलेल्या खोट्या आणि चुकीच्या माहितीच्या आधारे या विषयातली मतं तयार होतात. ही मतं म्हणजेच या विषयाचे गैरसमज,जे तुमच्याकडे प्रश्नरूपाने आले आहेत. आपल्याकडच्या स्त्रियांना ब-याचदा लग्न होईपर्यंत संभोगाविषयी काही ठाऊक नसतं. सारं काही नव-याला ठाऊक आहे तो बघून घेईल ही त्यांची धारणा असते. पण पुरुषालाही ते ठाऊक असतंच,असं नाही. आमच्याकडचे अनेक संसार अशा स्थितीत सुरू होतात. बरं,पुन्हा वातावरण असं की याबाबत कुणी उघडपणे बोलायचं नाही. बाईला यदाकदाचित याविषयीची माहिती असेल तर पुरुष ती तिच्याकडून घेणार नाही. कारण त्यांचा अहंकार आड येतो.’

‘माझ्या लहानपणी या विषयात जेवढे प्रश्न होते त्यापेक्षा आज या प्रश्नांची संख्या वाढलेली आहे. पण फक्त संख्याच! यांचं स्वरूप मात्र फारसं बदललेलं नाही. मी या विषयातली तज्ज्ञ नव्हे पण सामाजिक क्षेत्रात काम केल्यामुळे मी हे म्हणू शकते. आजचे हे प्रश्न मला पूर्वीच्या प्रश्नांपेक्षा अधिक बोथट वाटतात. हे अधिक घातक आहे. याच्या कारणांचा विचार करत असताना माझ्यासमोर प्रसार माध्यमांचं स्वरूप येतं. चित्रपट आणि ब्ल्यू फिल्मस् सोडाच पण दूरदर्शनवरून जी गाणी दाखवली जातात ती एवढी उत्तान असतात की वयात न आलेल्या मुलामुलींनाही सेक्स म्हणजे काय ते कळतं. हे असं चुकीचं ‘एक्सपोजर’ मग पुढच्या संकटांना जन्म देतं. आजच्या तरुणाला या विषयाची कमी माहिती नाही;पण जी मिळाली आहे ती चुकीच्या पद्धतीने मिळाली आहे. तो बलात्कार जाणतो पण त्याला शृंगार ठाऊक नाही. एका अर्थाने त्याला प्रश्न नाहीतच; उलट आपल्याला सर्व काही ठाऊक आहे असंच त्याला वाटतं.’

प्रसार माध्यमांनी माहितीचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर मारा केल्यावर खरं तर आजच्या तरुणवर्गाचे प्रश्न अधिक धाडसी असायला हवेत पण तसं ते दिसत नाही. हे नेमकं का घडत असावं या प्रश्नावर त्या म्हणाल्या,‘प्रसार माध्यमांमुळे माहिती मिळते पण दृष्टिकोन मिळत नाही. पूर्वीही आपल्याला सर्व माहिती आहे असा दृष्टिकोन होता,पण सिद्ध केलं तर तो चुकीचा आहे हे मान्य करण्याची तयारी होती. याबाबतचं एक उदाहरण मला आठवतं. तीस वर्षांपूर्वी स्त्री मासिकातर्फे लैंगिक विषयावरचं एक शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. आजवर अशी संधी न मिळाल्यामुळे खूप लोक येतील असा संबंधितांचा समज होता. पण फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. याची कारणं पाहू गेल्यावर लक्षात आलं की आपल्याला सर्व ठाऊक आहे असं मुलींना वाटत होतं. प्रत्यक्षात शिबिराला ज्या मुली आल्या त्यांनी हे मान्य केलं, की आम्हाला जे ठाऊक आहे असं वाटत होतं ते खरं तर ठाऊक नव्हतंच. आज ही प्रवृत्ती दिसत नाही. आजच्या तरुण वर्गाला प्रेम म्हणजे काय, कामजीवन चांगलं असावं असं वाटत असेल तर काय काळजी घ्यावी, लैंगिकदृष्ट्या मुक्त वातावरण असावं की नसावं असे प्रश्न का पडत नाहीत? मला स्वत:ला प्रामाणिकपणे वाटतं की नवरा-बायको म्हणून एकाच व्यक्तीशी नातेसंबंध असेल तर एका प्रकारचा शिळेपणा, अपुरेपणा वाटू शकतो. एकच एक व्यक्तीमुळे मानसिक गरजा पु-या होणं वा परिपूर्ण संवाद साधला जाणं हे होऊ शकणार नाही. उघड आहे की एकापेक्षा अधिक मित्र-मैत्रिणींची गरज लागणार. यातली एखादी मैत्री शारीरिक पातळीवरही गेली तर काय हरकत आहे? याचा अर्थ कोणतीही मैत्री शारीरिक पातळीपर्यंत जायलाच हवी किंवा प्रत्येक मैत्री शारीरिक पातळीपर्यंत गेली पाहिजे असं माझ्या म्हणण्याचा अर्थ नाही. पण अनेक देवघेवींबरोबर ही देवघेव झाली तर काय हरकत आहे? हा प्रश्न मी जेव्हा उपस्थित करते तेव्हा त्याला एक गंभीरपणा आहे. सखोलतेची जाण आहे. मूळ मानवी नात्याशीच निगडीत असा हा प्रश्न आहे. आजच्या तरुण-तरुणींना हा प्रश्न पडतो का? चुकीची माहिती आणि दृष्टिकोनाचा अभाव अशा वातावरणात हे प्रश्न पडणारच कसे?’

‘यावर उपाय म्हणून लैंगिक शिक्षणाचा मार्ग सुचवला जातो. माझ्या मते लैंगिक शिक्षणाची सुरुवात शाळेतून झाली पाहिजे. कुणालाही जेव्हा मूल होतं तेव्हाच त्याच्या आणि तिच्या लैंगिक शिक्षणाची सुरुवात होते. खरं तर सेक्सविषयक विचारले जाणारे प्रश्न अवघड असतात पण ते चुटकीसरशी सोडवून टाकल्याचं उदाहरण मला माहीत आहे. स्त्री-पुरुषात असा काय मोठासा फरक आहे हे म्हणताना जुन्या स्त्रिया मोठं छान वाक्य वापरायच्या. त्या म्हणत,‘पुरुष पुरुष काय करता,बाईपेक्षा चिमूटभर माती तर त्याला जास्त लागली आहे.’ मुलांच्या प्रश्नांना कसं सामोरं जायचं याचा हा वस्तुपाठ आहे. या प्रश्नांना घाबरणा-यांनी तो गिरवायला हरकत नाही. पालकांइतकीच शिक्षकांची भूमिकाही मला महत्त्वाची वाटते. शिक्षक हा खरं तर अर्धा पालकच असतो. शालेय शिक्षणाच्या माध्यमातून सेक्सविषयक माहिती कितीतरी सहजगत्या पोहचवता येईल पण तसा दृष्टिकोन हवा, इच्छाशक्ती हवी. या सर्वांपेक्षाही माध्यमांची भूमिकाही महत्त्वाची वाटते.

टीव्ही,वृत्तपत्रं,कथा,कादंबर्*या,कविता यांच्या माध्यमातून आज उत्तान भावनांना खतपाणी मिळत आहे. ते ताबडतोब कसं थांबवता येईल हे पहायला हवं. संपूर्ण समाजात एक निकोप लैंगिक वातावरण निर्माण होणं हे स्त्री चळवळीच्या दृष्टीनेही महत्त्वाचं आहे. स्त्री चळवळीमुळे स्त्रियांना याची जाण आलेली आहे. पण पुरुष वर्ग आज कोठे आहे? निकोप लैंगिक वातावरणाच्या दृष्टीने मला हे गरजेचं वाटतं.’

इथे आमच्या दृष्टीने एक टप्पा संपला. युवकांचे प्रश्न आणि त्यावरचे तज्ज्ञांचे विचार यातून या प्रश्नांकडे पहायचं कसं याची एक जाण आली. पण प्रश्नांकडे शास्त्रीय दृष्टीने पहावं, लैंगिक शिक्षणाची सुरुवात लहान वयात व्हावी,पालक,शिक्षक,प्रसारमाध्यमं अशा सर्वांनीच आपली जबाबदारी नीट पार पाडावी,यासाठी व्याख्यानं,शिबिरं हवीत. हे सारं जुनंच झालं असं कुणी म्हणेल, आम्हालाही तसंच वाटलं म्हणून यापैकी प्रत्येकाला आम्ही एक साधा प्रश्न विचारला होता की लैंगिक शिक्षणाचा अभ्यासक्रम काय असावा? पण त्याचं नीट उत्तर मिळू शकलं नाही. प्रश्न व्यापक पातळीवरचे आणि उपाय मात्र व्यक्तिगत वा चर्चा व्याख्यानांचे! हा गुंता कसा काय सुटावा? तज्ज्ञांच्या अनुभवाच्या आधारे आम्ही यात डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला. इथेही आमच्या मदतीला पुन्हा प्रश्*न आले. तरुणांनी प्रश्न विचारून त्यातली व्यापकता आम्हाला दाखवली. हीच व्यापकता जरा पुढे नेता येईल का? नेऊन पाहू.

बेफिकिरी चालेल काय?
मुलं जशी वयात येतात तसे त्यांना प्रश्न पडणारच. पण त्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज नाही. त्यांची ती उत्तरं शोधतात असा एक दृष्टिकोन पहायला मिळतो. या दृष्टिकोनात एक प्रकारची बेफिकिरी आहे. प्रश्नांपासून दूर जाण्याची प्रवृत्तीही आहे. दुसरा दृष्टिकोन असतो,‘जोवर शरीर आहे तोवर प्रश्न असणारच!’यातही जबाबदारी घेण्याची भूमिका नाही. प्रश्न संपणं शक्य नाही. मुलामुलींच्या डोक्यातील शंकांना कमी करणं, संपवणं शक्य नाही त्यामुळे तेव्हा तेव्हा ते प्रश्न पडणं आणि पडत राहणं यावरही उपाय नाही असं सुचवणारा हा मार्ग आहे.

मुलांना प्रश्न मात्र अव्याहतपणे पडत आहेत. आयुष्यातला महत्त्वाचा दीर्घ काळ ते प्रश्नांभोवती घुटमळत असतात. कधी हे घुटमळणं त्यांचं व्यक्तिमत्त्व बुजवतं तर कधी उद्ध्वस्त करतं. कालपर्यंत टीव्ही,विविध चॅनेल्स,रंगीत संगीत भडकपणे सजवलेली मासिकं किंवा उत्तानपणाचं समर्थन करणा-या नट्या नव्हत्या. आज त्या आहेत आणि उघा त्या वाढणारही आहेत. ही प्रक्रिया चुकीची की बरोबर हा प्रश्न नाही. प्रश्न आहे गेल्या दोन-पाच वर्षात बदललेल्या परिस्थितीचा नि वातावरणाचा. या वातावरणामुळे एकूण जगण्यातला या विषयाचा वेळ वाढणार आहे. तीव्रता वाढणार आहे. कुतूहल,उत्सुकता चाळवणार आहे. मालिका,चित्रपटात किंवा तद्दन कथा कादंब-यांत सेक्स-विषयक वर्णनांचं, चित्रणांचं प्रमाण वाढत आहे. या परिस्थितीत मुलामुलींचं लैंगिक जीवन हे असं आधाशासारखं विस्तारणार आहे. आजही आहे. खरंतर कालही होतं. पण हल्ली त्याला भलताच वेग आला आहे. तेव्हा मुलामुलींचं या विषयावरचं शिक्षण त्याच त्या गतीने आणि त्याच त्या मळलेल्या वाटेने होणार असेल तर महाभुकेल्या माणसाच्या हातावर छोटासा पेढा देण्यासारखं होईल.
आज ख-या अर्थाने गरज आहे ती तरुणांच्या लैंगिक जीवनाकडे जबाबदारीने किंवा समग्रतेने पाहण्याची. पण अशा पद्धतीने पहायला कुणी तयार नाही. जे पाहतात त्यांची संख्याही कमी आहे आणि त्यांच्यात परस्पर समन्वयाचा व सामाजिक अभिसरणाचा अभाव आहे. अजूनही पालक आणि शिक्षकांनी मुलांना विश्वासात घ्यावं, त्यांना मार्गदर्शन करावं, असं सांगितलं जातं आहे. प्रत्यक्षात शिक्षकांचं विघार्थ्यांशी असलेलं नातं अजिबात डळमळायला तयार नाही. गेल्या वीस वर्षांत किमान मध्यमवर्गाला तरी मुलामुलींना समजून घेण्याची संधी निश्चितपणे उपलब्ध होती. ही संधी किती आई-बापांनी मिळवली आणि मुलामुलींना विश्वासात घ्यायचा प्रयत्न केला हा शोधायचा भाग आहे. परिणामी पाल्य आणि पालकांमधील संकोचाची भिंत अधिकच भक्कम झाली आहे. तरुण मुलं डॉक्टरकडे न जाता त्यांना फोनवरून आपले प्रश्न विचारतात आणि आवश्यक तेवढी फी पाठवून देतात,असं एक डॉक्टर सांगत होते. अनेक वेळा फोनवरून प्रश्न विचारणारी तरुणी आपलं नावही सांगत नाही आणि समस्येचं उत्तर देण्याची याचना करते. याचा अर्थ या प्रश्नाबद्दलचा मोकळेपणा डॉक्टरांबरोबरही फारसा दिसत नाही. जसं आपल्या जवळच्या लोकांना आपल्या खाजगी जीवनातलं कळू नये अशी भावना असते तसं कुण्या तिस-या समोरही आपली ओळख पटू नये याचा आग्रह असतो. याचाच अर्थ सेक्सविषयक प्रश्नांची देवाण-घेवाण व्हावी, शंकानिरसन आणि कामप्रबोधन व्हावं यासाठीच्या आजवर गृहीत धरलेल्या एजन्सीज कुचकामी ठरताना दिसत आहेत. खाजगी पद्धतीने कुणी कुणाला समजावून सांगितलं तर त्याला आदर्श उदाहरण म्हणावं लागेल एवढी या विषयात गुप्तता,संकोच आणि दबलेपण आहे.

तरुणांच्या आजच्या मानसिकतेचा एक अर्थ यामुळे असाही आहे की मुलामुलींचा मूळ प्रश्न हा सेक्सविषयक प्रश्न नसून त्या संबंधातील गुप्तता,संकोच आणि दबलेपण हाच आहे. एकूण सेक्स संदर्भातला संकोच दूर करता आला तर ब-यापैकी मोकळं वातावरण तयार होईल आणि चित्रपट, मालिका,कादंब-यांतील चित्रणाला आशय दिल्यासारखं होईल. संकोच किंवा तत्सम भावनाही शारीर-विशेष नसून मूल्य विशेष आहे. त्यामुळेच एकेका मुलाचे किंवा मुलीचे प्रश्न महत्त्वाचे असले तरी मूल्य चौकट हाही महत्त्वाचा प्रश्*न त्यात आहे. चिडचिड्या-करक-या वातावरणात अभ्यास करणं आणि प्रसन्न वातावरणात अभ्यास करणं यात जो फरक आणि परिणाम आहे तोच इथेही आहे. संकोच, गुप्तता पोसणा-या चौकटीत युवकांचे प्रश्न पाहणं आणि संकोच, गुप्ततेला फाटा देऊन युवकांची मानसिकता पाहणं यात निश्चितपणे फरक आहे. मुलींचे कपडे, वर्तणूक, मॅनर्स, व्यवहार, व्यवसाय हे मुलींसारखेच पाहिजेत या आग्रहातून मुलगी बाईच बनते. ‘माणूस’ बनत नाही आणि मुलगाही ‘पुरुष’ बनतो ‘माणूस’ बनत नाही. कपड्यांच्या आत स्त्री आणि पुरुष ही लिंगं आहेत हीच भावना तयार होते. वस्तुत: कपड्यांच्या आत सर्व माणसंच आहेत ही भावना तयार व्हायला पाहिजे. याचा अर्थ मानसिकतेतील बदल अपेक्षित आहे. एक उदाहरण देऊन हीच बाब सांगता येईल. भारतासारख्या दूषित पाणी प्याल्या जाणा-या देशात ९० टक्के लोकांना पोटाचे कोणते ना कोणते विकार असतात असं डॉक्टरांनी सांगितल्यामुळे पोटाचे प्रश्न हे व्यक्तिगत रहात नाहीत. ते सामूहिक, सार्वजनिक बनतात. त्याचप्रमाणे शंका-कुशंका-अंधशंका यामुळे सेक्सविषयक प्रश्न आणि संकोची मानसिकता ही सामूहिक सार्वजनिक समस्या बनते. ज्याप्रमाणे दूषित पाणी स्वच्छ करण्याची योजना आखून अंमलात आणली जात नाही तोवर पोटाच्या विकाराचा प्रश्न राहणारच. प्रत्येकाने औषध घेत रहाणं हा त्यावरील तात्पुरता आणि वैयक्तिक उपाय झाला. त्याचप्रमाणे प्रत्येक तरुणाने आपला प्रश्न घेऊन संबंधितांकडे जाणं हा वैयक्तिक उपाय आहे. संकोचाची आणि लज्जेची भिंत पाडणं आणि त्यासाठी माहितीचं-सल्ल्याचं सुलभीकरण आणि सार्वत्रिकीकरण करणं गरजेचं आहे.

नववातावरण तयार करण्याची आणि तरुणाची दहा वर्ष ‘प्रॉडक्टिव्ह’ बनवण्याची हीच साधनं आहेत. हे झालं तरच तरुणाच्या लैंगिक मानसिकतेत आणि एकूणही समाजाच्या दृष्टिकोनात काही बदल होण्याची शक्यता आहे.

हिंदी चित्रपटांमध्ये कामुक हालचाली आणि दृश्य सर्रास दिसतात. लोक त्याबद्दल फार आक्षेप घेत नाहीत. परंतु एखाद्या पात्राने ‘बोल्ड’ वाक्य बोललेली मात्र लोकांच्या मेंदूला ठणकतात. दादा कोंडके यांच्या चित्रपटात सेन्सॉर बोर्ड हस्तक्षेप करतं तेही वाक्यांनाच. इथे कुणाचं समर्थन करायचा हेतू नाही, परंतु सेक्स या विषयावर बोलण्याला आपला विरोध दिसतो, पहायला हरकत नाही. या विषयावर बोलायचं नाही असा एकूण दृष्टिकोन दिसतो. जिथे मेंदूच्या कार्याचा भाग सुरू होतो तिथे त्या विषयावर पडदा टाकायची जी प्रथा आपल्याकडे आहे तीच इथेही दिसते. या विषयावर चर्चेचा अभाव आहे असा याचा अर्थ नाही. मुलंमुली आपापसात चर्चा करतात आणि मोठे आपल्या-आपल्यात. पण एकत्र चर्चा मात्र होत नाहीत. एखादा चित्रपट एकत्र बघता येत नाही म्हणून घरात दोन खोल्यात दोन टीव्ही घेण्यापर्यंत पालक मजल मारतात. एक मुलांसाठी आणि एक पालकांसाठी अशी आयडिया असते. पण दोन खोल्यातली संकोचाची भिंत दूर करायला कुणी तयार नसतं. कुणा एका घरातली भिंत खिळखिळी करून भागणार नाही. हे आज घरा-घरात चालू आहे.

लैंगिक प्रश्न वैघकीय नव्हे सामाजिक
युवकांच्या आणि नवयुवकांच्या उमेदीच्या आणि प्रतिभेच्या दहा-बारा वर्षांचा फैसला करणा-या या प्रश्नांना खुलेपणाने सामोरं जाण्याची गरज आहे. आज हे प्रश्न खाजगी असल्याने डॉक्टर-मनोवैज्ञानिक, सेक्सॉलॉजिस्ट महत्त्वाचे बनत आहेत. या प्रश्नांची उत्तरं या मंडळींकडे सापडतील असं अनेकांना वाटतं. एकेकाचा प्रश्न कदाचित या मार्गाने सुटेलही पण व्यापक अर्थाने ही समस्या तिथल्या तिथेच राहील. गेली वीस वर्षं या विषयातले प्रश्न बदललेले नाहीत हे याचं उत्तम उदाहरण आहे. युवकांना पडणारे हे लैंगिक प्रश्न ‘वैद्यकीय’ नसून ‘सामाजिक’ प्रश्न आहेत हे इथे लक्षात घ्यायला हवं. एकदा हे प्रश्न सामाजिक मानले की हा विषय केवळ डॉक्टरांच्या वर्तुळात न राहता व्यापक समाजभान असणा-यांच्या वर्तुळात राहतो. समाजाचा,समाज व्यवहाराचा,नीतिमूल्यांचा, समाज घडणीचा विचार करणा-या अभ्यासकांची,विचारवंतांची या विषयात हस्तक्षेप करण्याची जबाबदारी बनते. अमूर्त भारतीय नीतीकल्पना आणि शास्त्रीय कल्पना यांचं कृतक रोपण करणारे या विषयातले तज्ज्ञ, सेक्सची, अध्यात्मिकतेपासून विकृतीपर्यंत गूढ चर्चा करणारे विद्वान,मौन बाळगलेला समाज आणि प्रश्नग्रस्त युवक ही कोंडी आता फुटायला पाहिजे. इतर विषयांच्या मूल्यकल्पनांची फेरमांडणी करण्यात आघाडीवर असणारे विद्वान या बाबतीत फारसे उत्साही नसतात. चित्रपटातल्या, कथा कादंब-यातल्या अश्लील वर्णनांवर परखड टीका होते. पण या लैंगिकतेचा पोत बदलत नाही, ती जबाबदार, प्रौढ बनत नाही याची खंत फारशी दिसत नाही. एकसु-या लैंगिकतेच्या व्यापारावर एकसुरी टीकाच ङ्गक्त होत राहते. उथळ लैंगिक चित्रपटांप्रमाणेच,वरवर गंभीर आणि मानवी प्रवृत्तीचा शोध घेणारं साहित्यही शेवटी बाजारू लैंगिकतेला कसं शरण जातं हे सिद्ध करायचं तर फार शोध घ्यायची गरज नाही. पण याबाबत फारसं कुणी बोलताना दिसत नाही. आपल्या समाजात मोकळेपणा येईल या दृष्टीने हा विषय कसा मांडला जायला पाहिजे याचा गंभीरपणे विचार व्हायला हवा. हा विषय लोकांपर्यंत, तरुणांपर्यंत - शाळा कॉलेजातील नवयुवकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी स्वत: पुढाकार घ्यायला हवा. आज हा वर्ग शहामृगाप्रमाणं डोकं खुपसून बसला आहे. मानसिकता बदलायची असेल तर स्वत:च्या प्रतिष्ठेच्या आणि चारित्र्याच्या कल्पना कदाचित बाजूला ठेवाव्या लागतील. कदाचित त्याच ख-या कशा आहेत हे समाजाला पटवून घावं लागेल.‘काम विज्ञान क्लब’ सारख्या कल्पना राबवता येऊ शकतील काय याचा विचार व्हायला हवा. निव्वळ युवकांपर्यंत पोहोचणारं माध्यम शोधून तिथपर्यंत प्रभावीपणे पोहोचायला हवं. आणि शेवटी युवकांच्या प्रश्नांचं प्रकरण आणि मानसिकता समजून घ्यायची असेल तर ऍलोपॅथीतील अँटीबायोटिक्सचा मारा करून रोग दाबून टाकण्याची परंपरा सोडून घायला हवी. होमिओपॅथीप्रमाणे रोग शरीराबाहेर काढून शरीर स्वच्छ करण्याची पद्धत अवलंबायला हवी. आमच्याकडे आलेल्या युवकांच्या प्रश्नांच्या तीव्रतेमुळे एवढी बाब निश्चितपणे सांगावीशी वाटते.
Post Reply