अबोल प्रीत

Post Reply
adeswal
Pro Member
Posts: 3173
Joined: 18 Aug 2018 21:39

अबोल प्रीत

Post by adeswal »

अबोल प्रीत

नेहमीपेक्षा जरा जास्तच उशीर झाल्याने आकाश धावतच कॉलेज गेट वर आला. कॉलेज सुटले नाही हे पाहून त्याने हुष्य केले.

तो घामाने पूर्ण भिजला होता. चेहर्यावरील घामाच्या धारा लांबूनही सहज दिसत होत्या. विस्कटलेले केस, प्यांटमधून निम्मा बाहेर आलेला शर्ट आणि पळण्याच्या नादात बंद तुटलेली बॅग घेऊन झाडाच्या सावलीत जिथे तो नेहमी उभा राहतो तिथे जाऊन उभा राहिला. दम लागल्याने अजूनही त्याची छाती वर खाली होत होती.

प्रत्येकाला जीवनामध्ये कोणत्याना कोणत्यातरी गोष्टीबद्दल आकर्षण असतेच. तेच आकर्षण त्याला देहभान विसरायला भाग पाडत असते, पण त्याच स्थितीत तो अतिशय आनंदी असतो.

आकाशही त्याला अपवाद नव्हता. रोजची हीच वेळ त्याला या जगापासून तोडून एक वेगळ्याच आनंदी विश्वात घेऊन जात होती. तो वारंवार हातातील घड्याळाकडे पाहत होता. ५ वाजायला जेमतेम २-३ मिनिटे बाकी होते, पण तो वेळ त्याला खूप मोठा वाटत होता.

बरोबर ५ वाजता कॉलेज सुटण्याची बेल झाली, तसे त्याच्या काळजात धस्स झाले. हृदयाच्या स्पन्दनानी वेग पकडायला सुरुवात केली. मन अतिशय आतुर व्हायला लागले.

कॉलेज मधून हळूहळू मुलामुलींचे घोळके बाहेर पडायला लागले. आकाशची नजर प्रत्तेक मुलींच्या घोळक्यावर फिरत होती. बराचवेळ त्याचा हा खेळ सुरु होता. वेळ जाईल तशी त्याचे बेचैनी अधिकच वाढायला लागली. मनात निराशेचे मळभ जमा व्हायला लागले.

तेवढ्यात त्याची नजर एका मुलींच्या घोळक्यावर स्थिरावली. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. चेहऱ्यावर आनंद हसू पसरले. त्याला ती दिसली होती. हो तिलाच पाहण्यासाठी गेली ६ महिने अगदी अशीच किंबहुना या पेक्षा जास्त धावपळ तो करत होता.

ती दिसताच तो शेजारच्या गाडीकडे धावला. बाहेर आलेला शर्ट व्यवस्थित करून, खिश्यातील कंगव्याने मनसोक्त हुंदडनाऱ्या केसांना एका शिस्तीत बसवले. चेहरा व्यवस्थित केला आणि बॅग गाडीवरच ठेवून तो पहिल्या जागेवर आला.

आतापर्यंत ती खूप जवळ आली होती. तो तिच्याकडे पूर्ण देहभान विसरून पाहत होता. तिच्या प्रत्येक पावलागणिक त्याला दोघांच्या जवलीक्तेचा भास होत होता. त्याचे अंग अंग रोमांचित झाले होते. हसताना दिसणारे पांढरे शुभ्र दात त्याच्या आनंदाची पावतीच देत होते. तिच्याकडे एकाग्रतेने पाहण्याने त्याला आजूबाजूच्या गोष्टी दिसेनास्या झाल्या.

ती त्याच्या अगदी समोरून जाऊ लागली. त्याची तिच्या बद्दलची ओढ एवढी अनामिक होती कि त्याला तिच्या शरीराच्या सुगंधाचा भास होऊ लागला. अगदी उष्णतेच्या काळात एकादी थंड वाऱ्याची झुळूक चेहऱ्यावरून गेल्यावर जसे भाव पसरवते अगदी तसेच काहीतरी त्याचे झाले होते.

आता ती त्याला पाठमोरी होऊन चालत होती. तिची पाठमोरी आकृती अधिकच मोहक वाटत होती. चालताना होणारी तिच्या शरीराची हालचाल मनाला आनंद देऊन जात होती.

ती जशी दूर जाऊ लागली तसे त्याचे हावभाव बदलायला लागले. तिच्या लांब जाणाऱ्या प्रत्तेक पावलागणिक विरह त्याला आपल्या कवेत घेऊ लागला. सरते शेवटी ती दिसेनाशी झाल्यावर तो भानावर आला ते उद्या ५ वाजता तिला पाहण्याच्या विचारानेच.

आज रात्री आकाशला नेहमीसारखी झोप येत नव्हती. तो सतत कूस बदलत होता. त्याचे मन आज तिचे विचार सोडायला तयार नव्हते. त्याला ते वेगवेगळे प्रश्न विचारायला लागले. “कुठवर चालणार असे? याचा शेवट करावा का नाही? मी तिला आवडत असेन का? तिला दुसराच कुणीतरी आवडत नसेल ना?” शेवटचा प्रश्न त्याला जास्तच त्रासिक वाटला. रात्री कधीतरी त्याला झोप लागली.

बरोबर ५ वाजता बेल वाजली. कॉलेज मधून मुलामुलींचे घोळके लगबगीने बाहेर पडायला लागले. त्यांच्या पावलांमध्ये घराच्या ओढीने वेगळीच शक्ती संचारली होती.

दिवसभराच्या तणावग्रस्थ चेहर्यांवर हास्य फुलू लागले होते. हसरी आणि लाजरी शैला हि या लगबगीत सामील होती. ती दिसायला खूप सुंदर वगैरे नव्हती पण तिचे बोलणे, चालणे, वागणे तिच्याबद्दल आकर्षण निर्माण करणारे होते. तिचा पेहराव साधाच पण नीटनेटका असयाचा तो तिच्या सौंदर्याला जास्तच खुलवत होता.

तिची गडबड बाकीच्यापेक्षा जरा जास्तच होती. तिला कोणत्यातरी वेगळ्याच गोष्टीची ओढ लागली होती. आनंद तिच्या चेह्रावरून ओसंडून वाहत होता, पण ती गेट जवळ आली तसे तिचा आनंद विरळ होऊ लागला. मनात चलबिचल होऊ लागली. चेहऱ्यावर उदासीनतेने घर वसविले.
adeswal
Pro Member
Posts: 3173
Joined: 18 Aug 2018 21:39

Re: अबोल प्रीत

Post by adeswal »

आज तिला गेट वरचे वातावरण नेहमीप्रमाणे प्रसन्न करणारे नव्हते. तिच्या पावलांची गती अपोआप कमी होऊ लागली. आज आकाश शैलाला पाहायला गेटवर आला नव्हता.

तो रोज आपल्यासाठी येते येतो हे तिला माहित होते. पण तिने त्याला हे जाणवून दिले नाही. गेट वर आल्यावर कधीनव्हे ती चक्क थांबली होती .तिची नजर व्याकुळतेने त्या जागेकडे पाहत होती जेथून आकाश तिच्याकडे पाहायचा.

“तो का आला नाही? काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना? का माझ्या तटस्थ पणामुळे त्याचा काही गैरसमज झाला की काय?” अशा नानाविध प्रश्नांची रंग तिच्या मनात लागली. मैत्रिणींच्या गोंधळामुळे ती भानावर आली आणि जबरदस्तीने तिची पावले घराकडे चालती झाली.

शैलाचे घर कॉलेज पासुन बरेचसे लांब होते. तिच्या अगोदरच तिच्या मैत्रिणींची घरे होती. त्यामुळे ती सर्वात शेवटी घरी पोहोचायची. तिच्या घराच्या अलीकडेच निर्जन आणि झाडाझुडपांचा रस्ता होता.

शैलाच्या या हालचालींवर कोणीतरी लपून नजर ठेऊन होते. ती तिच्या घराकडे जाऊ लागली तसा तोही तिच्या मागून चालू लागला. शैला आकाशच्या विचारात एवढी गुंग होती कि तिच्या मैत्रिणींच्या बोलण्याकडे तिचे अजिबात लक्ष नव्हते. मैत्रिणींच्या ‘बाय’ ला प्रतिक्रिया द्यायचेहि तिला भान नव्हते. कोणीतरी आपला कोणत्यातरी विशिष्ट उद्देशाने पाठलाग करत आहे हेही तिला जाणवले नाही.

निर्जन आणि झाडाझुडपांचा रस्ता लागल्यावर त्याने आपला चालण्याचा वेग वाढवला आणि झपकन तो शैलाच्या पुढे येउन उभा राहिला. शैला त्याला धडकणार तेवड्यात दचकून थांबली. त्याला पाहताच तिच्या शरीरातून सरकन वीज निघून गेली. ती पटकन २-३- पावले मागे सरकली. तो आकाश होता.

आकाश आज जाणून बुजून शैलाला न दिसेल अश्या ठिकाणी उभा राहून तिची वाट पाहत होता. त्याला शैलाच्या आपल्या बद्दलच्या भावना जाणून घ्यायच्या होत्या. आपण न दिसल्यावर तिची प्रत्तेक हालचाल, तिचे प्रत्तेक हावभाव तिचे आपल्या बद्दलच्या मत प्रदर्शित करतील याची त्याला खात्री होती. आज तो काय समजायचे ते समजला होता.

शैला त्याच्यापुढे अंग चोरून उभी होती. मनातून खूप खुश असली तरी कोणीतरी आपणास पाहिल, या विचाराने ती आपली नजर सतत आजूबाजूला फिरवत होती.

हळूहळू तिच्या गालावरची कळी खुलू लागली. छातीतील धड धडीचा वेग वाढू लागला. शरीराचा हर कण रोमांचित होऊ लागला, पण त्याच्या नजरेला नजर भिडवण्याची हिम्मत अजूनही तिला होत नव्हती. आकाश मात्र न भिता तिच्याकडे एकटक पाहत होता. रोज वाटणारी भीती त्याच्या आसपासही नव्हती.

तिने हळूच हिम्मत करून आपली नजर आकाशच्या नजरेला भिडवली. आता मात्र तिची नजर तिथेच अडकून पडली. इच्छा असून हि ती नजर हटवू शकत नव्हती. दोघांच्या नजरा एकमेकांना भरपूर प्रतिसाद देऊ लागल्या. त्यांना जगाचे अजिबात भान राहिले नव्हते.

थोडा वेळ गेल्यावर आकाशने खिश्यातून एक सुंदर गुलाबाचे फुल काढले आणि थरथरत्या हाताने शैलापुढे धरले. शैलाने आपली नजर खाली केली. तिच्या चेहर्यावरचे भाव बदलू लागले. तिचे अंग थरथरू लागले. शैलातील हा बदल पाहून आकाशचे अवसान गळाले. त्याचा हात अधिकच थरथरायला लागला. पायातील जीव जाऊ लागला. शैलाच्या होकाराचा असणारा आत्मविश्वास पार डळमळू लागला.

शैलाने आकाशकडे तिरक्या नजरेने पहिले आणि आपल्या कुंदकळ्या खुलवत तिने ते फुल आकाशच्या हातातून अगदी अलगद घेतले. त्याच क्षणी आकाश चेकाळला. त्याच्या मनाला विलक्षण आनंद झाला. शरीराचा कण न कण उल्हासित झाला.

आजूबाजूची प्रत्येक गोष्ट नेहमीपेक्षा सुंदर वाटू लागली. बाजूची हिरवी झाडी अगदी हिरवी गर्द वाटू लागली, मावळतीकडे झुकलेला सुर्य खूप सुंदर वाटू लागला. सळसळनाऱ्या पानांचा आवाज मधुर संगीतासारखा वाटू लागला. दिवसभराचा थकवा कुठच्या कुठे पळाला. पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याची ताकत त्याच्यात संचारली. शैला त्याच्या या प्रतिक्रिया पाहून गालातल्या गालात हसत होती.

काही वेळ दोघांची नजर पुन्हा एकमेकांच्या नजरेत गुंतली. थोड्यावेळानंतर शैला भानावर आली. ती आकाशच्या बाजूने वाट करून आणि गालावरचे हास्य अधिकच गडद करत जाऊ लागली.

जाताना तिने ते फुल आपल्या हृदयाजवळ धरले होते. ती आनंदी चेहऱ्याने आपल्या घराची वाट चालू लागली. आकाश ही जगातील श्रीमंत माणसाच्या अविर्भावात तिच्या विरुद्ध दिशेने चालू लागला, पण दोघांनी हि एकमेकांकडे एकदाही वळून पहिले नाही. कारण त्यांना माहित होते कि, आपण ज्या बंधनात अडकलो आहे, त्याला कोणत्याही शाश्वतीची गरज नाही.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
Post Reply