सुपरवूमन

Post Reply
adeswal
Pro Member
Posts: 3197
Joined: 18 Aug 2018 21:39

सुपरवूमन

Post by adeswal »

सुपरवूमन

सकाळची घाई गडबड आटोपून श्वेता जरा निवांतपणे बसली होती. बाईसाहेबांचा मूड जरा ऑफ होता. आजकाल मूड ऑफ व्हायला काहीही कारण चालायचं. अगदी केस मनासारखे बांधता येत नाहीत किंवा साडीचा पदर निट बसला नाही अशा शुल्लक गोष्टी वरूनहि ती हिरमुसायची.

चाळीशी ओलांडली म्हणजे आता आपल वय होत आहे असा तिने समज करून घेतला होता. तिच एक मन तिला तू अजूनही पूर्वी इतकीच सुंदर आणि तरुण आहेस असं सांगायचं. मग पुन्हा, ‘नाही वय होत चालाय हेच खर आहे,’ असं तिला वाटायचं.

स्वतःशीच ती भांडत बसायची आणि मग सारखी डिस्टर्ब रहायची याचा परिणाम म्हणून कधी आमटीत मीठ कमी पडायचं नाहीतर भाजीत तिखट जास्त पडायचं. मग नवरा तिला चिडवण्यासाठी हळूच टोमणा मारायचा, “श्वेता आजकाल तू विसरभोळी होत चाल्लीस हं!”

काल तर सुमित सुद्धा बोल्ला, “आई तुला काहीच कसं कळत नाही गं मोबाईल मधील, काल मी तुला मेसेज केला होता ना कि मि संध्याकाळच्या जेवणासाठी घरी नाहीए मला घरी यायला वेळ होईल, तरी तू काल माझं जेवण केलस आणि माझी वाट बघत बसलीस.”

“अरे ..पण तुला साधा फोन करता येत नाही का? मी काय तुमच्याप्रमाणे सारखा फोन हातात घेऊन बसते का? तुझा मेसेज कधी आला मला काय माहित.” श्वेता

“अगं आई, सारखा फोन हात घेऊन कशाला बसायला हवा, मेसेज टोन वाजली कि बघायचा कुणाचा मेसेज आला आहे ते हव तर मेसेजची टोन जरा लाउड कर म्हणजे तुला तु किचन मध्ये असलीस आणि फोन दुसरीकडे असला तरी आवाज ऐकू येईल.” सुमित

“मला नाही बाबा ते काही जमत तूच काय ते करून दे ”

“अगं आई सोप आहे सेटींग मध्ये जा आणि कर ,एवढ पण कस काय जमत नाही तुला चांगली सुशिक्षित आहेस तू.”

झालं एवढच कारण पुरेस होत तिच्या डोळ्यात पाणी यायला. ती शांत बसली. खरचं एवढं सुद्धा कसं जमत नाही आपल्याला, आपल्याला काहीच कसं येत नाही, सगळेच आपल्याला बोलताहेत. ती स्वतःशी पुटपुटली.

आजकाल तर तीसुद्धा सारखी सारखी तिला चिडवायला येत होती. चांगली मैत्रीण होती तिची ती पण आजकाल तीसुद्धा सारखे उपदेशाचे डोस द्यायला यायची. जरा निवांतपणे बसली की आली लगेच, कधी कधी जेवण करताना यायची तर कधी झोपायला गेल की यायची. तिच्यावर पण ही जाम वैतागली होती. कधी तरी चांगल सुनवायला हवं तिला.

आज जरा रिकामा वेळ मिळाला होता म्हणून ही पेपर हातात घेऊन बसली होती पण वाचनात लक्ष नव्हत. आज जर ती आली तर तिला चांगलचं ओरडायच असं ठरवल होत हिने पण ती अजून आलीच नव्हती.

जाऊ दे आली की मग बघु असं म्हणून ती उठली आणि आरश्यासमोर बसली. आपल्या लांबसडक केसातील गुंता तिने सोडवायला घेतला. केसातून बोट फिरवत असताना ती जुन्या आठवणीत रमली.

“याच केसांवर भुलून शशांक ने लग्नासाठी प्रपोज केल होत. सगळ्या मैत्रिणी आपल्या केसांचा हेवा करायच्या. शशांक तर या केसांच्या जादूनेच आपल्या प्रेमात पडला होता. पण आज त्याला वेळ तरी असतो का आपल्याकडे पहायला. नुसत ऑफिस, मिटींग, घरी आलं कि जुजबी बोलणं, जेवण, मुलांशी गप्पा की गेला झोपायला, दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच.”

तीच मन खट्टू झालं. तेवढ्यात ती आली.

“आता तू पूर्वी सारखी राहिली नाहीस ना. झालीस आता तू म्हातारी…” असं म्हणून ती जोरजोरात हसू लागली.

हिने चमकून वर बघितलं. थोडावेळ तिला निरखून पाहिलं आणि म्हणाली, “आलीस बर झालं. वाटचं बघत होते तुझी. का गं मला चिडवत असतेस नेहमी.”

“अग मी कुठे चिडवते, तू जशी आहेस, जशी वागतेस तेच तर तुला मी सांगते.” ती

“जशी आहेस म्हणजे, मी काय म्हातारी झाली आहे होय गं!” श्वेता

“का? नाही झालीस का मग..” ती मिश्कीलपणे हसत म्हणाली.

“तू ना आधी तुझ ते हसण बंद कर.” श्वेता तिच्यावर तणतणली.

“अग शांत हो किती त्रागा करून घेतेस,काय झालय तुला, का एवढी चिडचिड करतेस.” ती

“हो.. जसं काही तुला काही माहितच नाही ना.” श्वेता

“मला माहित आहे गं पण आज तू बोल.” ती

“मी काय बोलू, सगळे मलाच नुसते बोलत असतात. असं वाटतयं सगळं जगचं मला चिडवत आहे, तुला काही येत नाही, तू विसरभोळी झाली आहेस, वय होत चाललय. त्यात मला आजच्या पिढीतीलं काही कळत नाही. मला आतून खूप एकटं एकटं वाटतय गं. शशांक चिडवतो, कधी मुलं बोलतात, सासूबाई तर आहेतच वरून तिखटाची फोडणी घालायला. तुला माहित आहे, काल मी तेलावरच्या सुंदर पुरणपोळ्या केल्या होत्या, खूप छान अगदी रेशमासारख्या मऊसूत झाल्या होत्या. सगळ्यांनी आवडीने खाल्ल्या, शशांकने कौतुक पण केल. ह्या मात्र काही बोलल्या नाहीत छान झाल्या आहेत म्हणून, दिवसभर त्यांची लेक कशी पिझ्झा बर्गर घरीच बनवते हेचं पुराण सुरु होत.” श्वेता

“जाऊ दे गं. तू लक्ष नको देऊ, याने तुलाच त्रास होईल.” ती

“लक्ष कस नको देऊ. मी काही चांगल करतच नाही का? मलाही आज तीस पस्तीस हजाराची नोकरी असती. मी पण नोकरी केली असती. पण घराकडे कोण बघणार म्हणून मला घरी बसाव लागलं. तुला तर माहितच आहे शशांक आणि मी दोघे एकदमच होतो इंजिनिअरींगला. मलाच जास्त मार्क होते फायनला. कॅम्पस सिलेक्शन होऊन चांगला जॉब पण करत होते मी. पण लग्न झाल्यावर तोच म्हणाला थोडे दिवस जॉब सोडतेस का तू? तुझीच दमछाक होईल घर जॉब दोन्हीकडे आणि आता तोच मला घर कोंबडी म्हणून चिडवतो. काय करत नाही मी या घरासाठी, रोज सकाळची धावपळ, डबे, बाजार, बिले, कुणी आजारी असेल तर दवाखाना, सणवार, पै पाहुणे अगदी सगळ पण कुणाला माझी किंमतच नाही.”

“अग थांब… थांब… जरा…. तू नीट लक्ष दिलंस का, तूच मला सांगतेस की तू काय काय करतेस ते. मग तुला असं का वाटतय की तुला काहीच येत नाही, जमत नाही म्हणून आणि तुला जे वाटतयं कि कुणालाच तुझी किंमत नाही. पण मला सांग तुला तुझी किंमत आहे का? तू किती स्वतःला किंमत देतेस? किती काळजी घेतेस स्वतःची? रात्रीच शिळं बाकी कुणाला आवडत नाही आणि टाकलं तर वाया जात म्हणून तूच तुझ्या पोटात ते धकलतेस. बाकी सगळ्यांना सकाळचा नाश्ता देतेस पण तू त्यांच्या सोबत बसून किती वेळा सकाळचा नाश्ता करतेस, तू घरी आहेस म्हणजे काही नाही खाल्ल वेळेवर तर चालत असं समज कुणी करून घेतलाय? तूच ना.. आजारी आहेस ताप आला म्हणून किती वेळा तू आराम केला आहेस? घरी आहे म्हणजे आरामचं आहे असं तूच तर सांगतेस ना? मग कंबर दुखते म्हणून कशाला बडबड करतेस?” ती

“हो पण कितीही बडबड केली ना तरी कुणी लक्ष देत नाही.” मधेच श्वेता बोलली.

“त्यांनी का द्याव लक्ष. आधी तू दे ना लक्ष स्वतःकडे. स्वतःला सुपरवूमन बनवलं आहेस तू. आपण नाही केलं तर आपण कमी पडू असा समज करून घेतला आहेस. सारखं सारखं स्वतःला सिध्द करण सोडून दे आणि स्वतःकडे लक्ष दे. तुला तुझं हिमोग्लोबिन, बी.पी, शुगर माहित आहे? सुंदर दिसणे, तरुण असणे म्हणजे केवळ ‘३६ २४ ३६’ हा काही फॉरमॅट नाही. आरोग्य चांगलं असणे पण महत्त्वाच आहे. स्वतःमध्ये बदल कर.” ती

“हो मी करतेय नं स्वतः मध्ये बदल. परवा लेकीने आग्रह केला म्हणून मी जीन्स आणि टीशर्ट घातला होता आणि महिला मंडळाची ट्रीप गेली तेव्हा आम्ही सगळ्यांनी स्कर्ट पण घातला होता.” श्वेता

“अग पण कपडे बदलले म्हणजे तू बदललीस असं नाही ना .तुझ्या विचारांचं काय ते बदलायची गरज आहे. मला काही जमत नाही, मला आजच्या पिढीतील काही कळत नाही. मला सगळे चिडवतात हे जे तू स्वतःला तुझ्या विचारांच्या कोषात बांधून घेतल आहेस त्यातून बाहेर पडण गरजेच आहे. स्वतःच्या बंधनातून स्वतःला मुक्त कर. कुणी तरी येईल आणि मला मुक्त करेल याची वाट पाहू नको. स्वतःच्या छंदाना वेळ दे. नव्या पिढीतील मुलींशी मैत्री कर. स्वतःला तरुण ठेवण्यासाठी आरोग्याची काळजी घे.” ती

“हो गं तुझ बरोबर आहे पटतयं मला” श्वेता

“चल मग दे टाळी आणि लाग कामाला.” ती

स्वतःला बंधन मुक्त करण्याचा निश्चय करून श्वेताने तिला टाळी द्यायला आरश्यावर हात मारला आणि त्याच क्षणी तिची मैत्रीण म्हणजे तिचं प्रतिबिंब गायब झाले.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
Post Reply