माझे पहिले प्रेम

Post Reply
adeswal
Pro Member
Posts: 3197
Joined: 18 Aug 2018 21:39

माझे पहिले प्रेम

Post by adeswal »

माझे पहिले प्रेम

१० वीपर्यंत मुलांच्या शाळेत शिकलो. ११ वी – १२ वी पण छोट्या कॉलेजला असल्यामुळे तिथे पण फार मुली नव्हत्या. त्यामुळे मुलींमध्ये गेल्यावर त्यांच्याबरोबर कसे बोलायचे कसे वागायचे ह्याचा फारसा अनुभव नव्हता.

१२ वी नंतर मोठ्या कॉलेजला गेलो. प्रथम वर्षांच्या पहिल्याच दिवशी ती दिसली. तिकडे एका घोळक्यात थांबली होती.

तिच अतिशय सुंदर, निरामय आणि मनमोकळं हास्य पाहून मनाला खूप छान वाटलं. जाऊन तिच्याशी बोलावसं वाटलं. पण आम्ही इतके धीट कुठे? मनातली इच्छा मनातच दाबली आणि सगळे मुकट्यानं लेक्चर जाऊन बसलो.

तिच्याशी बोलण्याचा योग आला तो वार्षिक परीक्षेच्या दिवशी. एक वर्ष तिला लांबून बघण्यातच समाधान मानलं. खूप धाडसानं मी बोलायला पुढे सरसावलो आणि माझ्या तोंडातून एकदाचे शब्द फुटले, “हाय, कसे गेले पेपर? मला इलेक्ट्रोनिकचे दोन्ही पेपर फार अवघड गेले.”

“गेले गठठ्यातून, आता निकाल लागला की कळेलच कसे गेले होते ते. बाकी? सुट्टीत काय करणार?” ती

“काही ठरवलं तर नाहीये, बघू.” मी

“ओके, बाय, मला जायचंय.” ती

“बाय.” मनात इच्छा नसून पण मला बाय करावे लागले आणि स्कूटी वरून ती निघून गेली.

दोघांकडेही फोन नव्हता. त्यामुळे सुट्टीभर काहीच संपर्क झाला नाही. अख्खी सुट्टी निघून गेली आणि परत एकदा कॉलेजचा दिवस उजाडला. आज ती दिसणार म्हणून मनातल्या मनातच मी खूश होतो.

ती कुठे दिसतेय का बघायला मी गेटवरच थांबलो. ती आली, गाडी पार्किंगमध्ये नेताना तिनी मला बघितलं आणि मस्त स्माईल दिली. ती आपल्याकडे बघून हसली? मी ह्या नशेत असतानाच ती गाडी लावून माझ्याजवळ येऊन थांबली.

“काय म्हणताय साहेब? इथे का थांबलाय?” ह्या वेळेस तिनी सुरुवात केली.

मला एकावर एक सुखद धक्के बसत होते. “काही नाही, सहजच कोणी ओळखीचं दिसतंय का ते बघत होतो. चल जायचं का वर्गात?”

“हो चल, उशीर झाला आहे, लेक्चर चालू झाला असेल.” आणि संभाषणाला सुरुवात झाली.

ती बोलायला सुद्धा खूप मस्त होती. तिचं बोलणं तासंतास ऐकावं असे वाटायचं. जसे दिवस पुढे पुढे जाऊ लागले, तसे आमच्यामध्ये मैत्री निर्माण झाली. इतर मुलींबरोबर पण मी अगदी बिंधास्तपणे बोलू लागलो.

मला बुद्धिबळात आवड असल्याने लेक्चर बुडवून, मी त्या पत्र्याच्या आर्ट सर्कलच्या खोलीत जाऊन सराव करायला लागलो. साधारण आठवडा गेला असेल, तिने मला विचारलं, “चल, मी पण येते बुद्धी लावायला.”

“अरे वा! चल मग!” मी एकदम आनंदानं उत्तर दिले.

त्या दिवसापासून कोणत्याच लेक्चरला न बसता थेट आर्ट सर्कलच्या खोलीत जाऊन, त्या लोकांची नाटक बघत बुद्धिबळाचा सराव करायचा, अशी आमच्या दोघांची दिनचर्या झाली. तिला बुद्धिबळामधलं खरं काहीच येत नव्हतं, तरी ती यायची. कदाचित फक्त माझ्या सहवासात राहायचे म्हणून येत असावी असं मला वाटू लागले.

ती खास माझ्यासाठी डबा करून आणू लागली. आमच्यामधील नात हे मैत्री पुरते उरले नाहीये ह्याची एव्हाना दोघांना जाणीव झाली होती.

माझ्यासाठी एखादी वस्तू आवडणे परिचित होतं, पण एखादी व्यक्ती आवडणे हा अनुभव नवीन आणि फार वेगळाच होता. मी तिला विचारायचं ठरविलं. त्या दिवशी ती आली, थोड्याफार गप्पा झाल्या.

“काय रे? आज इतका गप्प गप्प का? काही होतंय का तुला?” ती

“नाही गं, असच, मला काहीतरी बोलायचं होतं तुझ्याशी.” मी

“अरे मग बोल ना.” ती

“असू दे गं, परत कधीतरी बोलीन.” मी

माझ्या मनात काय चालू आहे हे तिने बरोब्बर ओळखलं, तिला पण हेच हव होतं.

“चल आपण स्कूटीवर फिरायला जाऊयात.” ती

मी मुकट्यानं तिच्या मागे बसलो. तिनी गाडी पाषाणच्या त्या मस्त एरियात नेली.

“हा, तू काहीतरी बोलणार होतास.” ती

तिने दिलेला सिग्नल न ओळखायला मी इतका वेडा नव्हतो. मी मन घट्ट केलं, मोठा श्वास घेतला आणि बोलून मोकळा झालो, “मला तू खूप आवडतेस!”

“काय?” तिच्याकडून हे उत्तर आलं.

“मला जे बोलायचं होतं, ते मी बोललो, चल आता मला परत सोड कॉलेजजवळ.” मी प्रचंड हिंमत दाखवून घाई घाई मध्ये बोललो.

तिनी गाडी बाजूला घेतली आणि माझ्या डोळ्यात डोळे घालून ती म्हटली, “तिकडे रस्त्याकडे काय बघतोय? माझ्याकडे बघ.”

मी हळूहळू नजर तिच्या डोळ्यांकडे नेली.

“हा आता परत बोल, मघाशी काय बोललास.” ती

“मला तू खूप आवडतेस गं, तुझी खूप आठवण येते, तुझ्याशी बोललो नाही ना, तर करमत नाही बघ, फार विचित्र वाटत.” तिच्या नजरेला टाळून मी एवढे बोललो आणि तिच्या उत्तराची वाट बघू लागलो. आपण फार मोठा घोटाळा केला असं मला वाटू लागलं.

“ए वेड्या, हे बघ, वरती बघ माझ्याकडे.” ती बोलली. मी नजर हळूहळू तिच्या डोळ्याकडे नेली.

“मला पण तू खूप आवडतोस, मला पण तुझी खूप खूप आठवण येते.” हे बोलताना तिची नजर हळूच बाजूला दुसरीकडेच गेली होती.

तिचे शब्द कानावर पडताच माझा आनंद गगनात मावेनासा झाला, तिला कडकडून मिठी मारायची इच्छा झाली पण वेळ आणि जागा चुकीची असल्यामुळे ते राहून गेलं.

गाडी परत फिरली, कॉलेजच्या गेटजवळ पोहचेपर्यंतची ती ६-७ मिनिटे मी मनातल्या मनातच हसत होतो. स्वतःवरच मी प्रचंड खूश झालो होतो. ह्या गोष्टीला प्रोपोज करणे म्हणतात हेही मला माहीत नव्हत.

तिनं मला कॉलेजच्या दारात सोडले, आता मात्र आम्ही दोघही एकमेकांच्या नजरेत अगदी बिनधास्त बघत होतो. तोंडातून एकही शब्द न काढता सुद्धा आमच्यामध्ये प्रचंड मोठा संवाद चालू होता.

मग कॉलेज २ ला संपले की घरी न जाता तिथेच ५ वाजेपर्यंत गप्प मारत बसायच्या, ५ ला गणिताच्या क्लासला दोघांनी एकत्र तिच्या स्कूटीवरून जायचे. एव्हाना मी सायकल आणायची बंद केली होती.

क्लास मधून घरी जाताना “घरी पोचलीस की घरच्या फोन वर मिस कॉल दे,” असं सांगणं, बाहेर खाणेपिणे, खास करून कॉलेज जवळच्या त्या कॅन्टिनला जाऊन गप्पा मारणे. अशा काही गोष्टी अगदी नियमित चालू झाल्या.

एक दिवस मी सहजच विचारलं, “काय मग? मी पहिलाच ना?”

तिला बहुतेक हा प्रश्न अनपेक्षित होता. ती गोंधळली. बराच वेळ झाला तरी तिच्या तोंडातून शब्द बाहेर येईना. मग अगदी गंमत म्हणून सहजच विचारलेल्या माझ्या प्रश्नाबद्दल मलाच चिंता वाटू लागली. बराच वेळ झाला शांतता होती. परत एकदा मीच पाऊल उचलले.

“अग बोल ना, काय झालं? कोणी असेल तर सांग. प्लीज लपवू नकोस.” मी म्हणालो.

आता मात्र ती खूपच गंभीर झाली. तिचे डोळे पाणावले.

“मला माफ कर वेड्या, मी तुझ्यापासून हे लपवून ठेवलं, मला एक जण आवडायचा या आधी, पण प्लीज, आता तसं काही नाहीये, ह्या गोष्टीला आता बरेच दिवस झाले… मी ते विसरलिये.” ती

भयाण शांतता पसरली आणि ती बराच वेळ टिकून होती.

“वेड्या, प्लीज काहीतरी बोल रे. मला तू खूप आवडतोस रे, खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर.” ती

मला काय बोलावे ते कळेना. मी थोडी अधिक विचारपूस केली आणि माझ्या प्रत्येक प्रश्नाला तिनं उत्तर दिलं, जणू काही मी तिला हे प्रश्न विचारीन हे तिला माहीतच असावे. प्रत्येक उत्तर माझ्या कानांमधून जाताना मला प्रचंड त्रास होतं होता.

तो ८ महिने बाहेर आणि ४ महिने पुण्यात असतो, भरपूर पगार आणि अस बरंच काही त्याच्याबद्दल ऐकायला मिळालं. माझ्या अंगावर वीज पडावी, तशी माझी अवस्था झाली, मी अगदी सहज गंमत म्हणून विचारलेल्या प्रश्नाला इतकं वेगळं वळण मिळेल असा मी विचारही नव्हता केला.

मी माझी सॅक घेतली आणि मी एक शब्दही न बोलता तडकाफडकी तिथून निघून गेलो. २-३ दिवस गेले, मी काहीच संपर्क केला नाही, तिचाही फोन आला नाही. मी माझ्या मित्राशी याबद्दल बोललो. तो आमच्या दोघांचा चांगला मित्र होता.

“हे बघ, तुला ती खरंच मनापासून आवडते?” तो मला धीर देत बोलला.

“हो रे? हे काय विचारणं झालं का?” मी म्हणालो.

“तिच्यावर पूर्ण विश्वास आहे?” त्याने विचारलं.

“हो आहे रे पण,” मी बोललो.

“पण वगैरे काही नाही, आधी तिला जाऊन भेट. परत कसलाही विचार मनात आणू नकोस. तिच्यावर खूप मनापासून प्रेम कर. ती तुझीच आहे फक्त तुझीच.” तो म्हणाला.

तिला मी कॉलेजमध्ये गाठलं. एखादा नवीन ओळख झालेला माणूस ज्याप्रकारे बोलेल त्या पद्धतीनं मी तिला म्हणालो, “हाय, काय चाललंय?”

“काही नाही विशेष.” तिने पण तसंच उत्तर दिले.

कॉलेज संपल्यावर आम्ही अगदी नेहमीप्रमाणे बसलो होतो, पण आज आमच्यामध्ये फार गप्पा होतं नव्हत्या.

“आज फार बोर होतंय नाही.” मी उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोललो.

खरं तर मी तिच्यासोबत बसून संपूर्ण आयुष्य काढायला पण तयार होतो.

“हो ना, खरंच आज फारच बोर होतंय, क्लासला पण वेळ आहे अजून बराच, चल आपण कुठेतरी जाऊयात.” ती म्हणाली.

“कुठे जायचं? मला फार काही माहीत नाही ह्या एरिअयातमधलं, प्लीज कॅन्टीन नको, तिथे जाऊन जाऊन मला कंटाळा आलाय.” मी पण माझं मत मांडलं.

“वेड्या, माझ्या घरी येतोस? इथे जवळच आहे. चल जाऊ. बस मागे.” ती म्हणाली.

माझ्या उत्तराची वाट न बघताच तिनी गाडी सुरू केली, मी मागे बसलो आणि गाडी निघाली. तिच्या भावाशी आणि आईशी आपण काय बोलणार आहोतं, ह्याची मी तयारी सुरू केली.

आम्ही घरी पोचलो. घरी कोणीच नव्हतं. मी एक सुस्कारा सोडला. तिनी मस्त चहा आणि मॅगी करून आणले. आम्ही पहिल्यासारखे बोलत नव्हतो ह्याची जाणीव दोघांनाही होती.

मॅगी खाता खाता एकमेकांना नजर भिडली, मॅगीची प्लेट मी अलगद बाजूला ठेवली आणि तिच्या जवळ जाऊन तिला कडकडून मिठी मारली. तिला पण खूप आनंद झाला. झालं गेलं सगळं विसरायला झालं आणि आमची गाडी परत एकदा सुरळीत चालू झाल्याची जाणीव आम्हाला झाली.

कधी कधी तिच्या घरी जाणं, मग तिनी मस्तपैकी चहा – आणि मॅगी बनवणं, तिच्या कुशीत पडून मस्त गप्प मारणं, भविष्याची स्वप्ने रंगविण, अश्या गोष्टींनी मन अगदी प्रसन्न होतं होतं. प्रेम खरंच इतकं सुंदर असत ह्याची जाणीव झाली.

काही महिने निघून गेले. सर्व काही सुरळीत चालू होते. त्यादिवशी त्यांच्या घरी असताना, अचानक फोन वाजला. तिने उचलला आणि ती खूप खिन्न झाली. फक्त “ठीके, येते लगेच,” अस ती फोनवर बोलली.

तिनी पटापट आवरायला घेतलं, आणि आवरता आवरताच ती मला बोलली, “चल वेड्या, मला जायला लागेल.”

फोनवरील व्यक्ती कोण होती हे मला कळू शकले नाही,

“अग, काय झालं? अस अचानक कुठे निघालीस? कोणाचा फोन होता?” मी विचारलं.

“तुला सांगायलाच पाहिजे का कोणाचा फोन होता ते?” तिने उलट प्रश्न केला.

“हो, मला सांगायलाच पाहिजे.” मला ते न जाणून कशी चैन पडली असती?

“तो पुण्यात आलाय, त्यानं मला त्याच्या घरी बोलवले, काहीतरी काम आहे म्हणे.” ती म्हणाली.

माझ्यासाठी हा प्रचंड मोठा धक्का होता. तरीपण मी स्वतः ला सावरत मन खंबिर केलं. माझ्या भावना चेहऱ्यावर आणण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला.

“ठीक आहे, जा.” तिला नाही म्हणून मला उगाचच वाईटपणा घ्यायचा नव्हता.

का कुणास ठाऊक पण आमच्या नात्याचे अस्तित्त्व आता फार काळ टिकणार नाही, असं मला उगाचच वाटले. त्या दिवसपासून ती माझ्याशी आधीसारखी बोललीच नाही, तिच्या डोळ्यात सतत काहीतरी लपवत असल्याची भावना मला स्पष्ट दिसायची.

माझं मन ह्या प्रकारानं फार चिरडून निघत होते. त्या दिवशी ती फार वेगळी दिसत होती, रडून रडून डोळे सुजले होते, ती बहुतेक मनाचा पूर्ण निश्चय करून आली असावी. क्लास संपल्यावर तिनी मला थांबवलं, गप्प मारत मारत आम्ही हॉस्पिटलच्या पुलावर जाऊन उभे राहिलो.

“वेड्या, मला तुला काहीतरी सांगाचय रे.” ती म्हणाली.

“ह्म्म मला कल्पना आलीय, बोलून टाक.” मी अतिशय घट्ट मनानं तिला बोललो.

तिला असे दाखवायचा प्रयत्न केला, की ती मला काहीपण बोलली तरी मी अतिशय कठोरपणे ते पचवून घेईन.

“मी त्याच्याशिवाय नाही रे जगू शकत. एम सॉरी. प्लीज मला माफ कर. प्लीज.” ती म्हणाली.

माझी स्वतःवरच खुप चिडचिड झाली. काहीही न बोलता मी उलटा फिरलो, माझ्या हताश, हरलेल्या मनाला सावरत घरी पोचलो. वरच्या खोलीचे दार लावून रडत बसलो.

तिनी जे काही केलं हे तिलाच नीट कळत नव्हतं, असं म्हणून मी मनातल्या मनात तिला माफ करून टाकलं, पाकिटामधून तिचा फोटो काढला, कसलाही विचार न करता मी तो फोटोचे तुकडे केले. आमच्या प्रेमाची गाडी रुळावरून माझ्या डोळ्यासमोर घसरली आणि मी मात्र बघतच राहिलो.

असेच दिवस जात राहिले. परत तिच्याशी बोलण्याचा फारसा प्रयत्न केला नाही. तिला मनात खोल कुठेतरी गाडून टाकलं. अजून पण अधून मधून मेसेज आणि क्वचित कधीतरी फोन पण होतो. हे बरोबर नाहीये हे माहीत असून पण मेसेज जातोच.

नंतर अनेक मुली भेटल्या, पण मनापासून कोणी आवडली नाही. मी पण शोधायचा प्रयत्न केला नाही. कधी कधी स्वतःच्या परिस्थितिवरच हसू येत. एक वेळ अशी होती की माझ्याकडे गाडी नव्हती, पैसे नव्हते पण ती होती, आणि आता माझ्याकडे गाडी आहे, पैसे आहेत, पण प्रेम करायला ती नाहिये.

काही लोक म्हणतात, “पाहिलं प्रेम तेच खरं प्रेम, बाकी सगळी मजबूरी.” सध्या तरी मला हेच बरोबर वाटतंय.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
Post Reply